breaking-newsमुंबई

आता शिवडीच्या समुद्रात भराव

  • २३३ एकर समुद्र बुजवून सेंट्रल पार्कचा घाट;मुंबई पोर्ट ट्रस्टचा केंद्र सरकारकडे प्रस्ताव

कफ परेड येथील समुद्रात भराव टाकून हरित उद्यान (ग्रीन पार्क) उभारण्याचा मुंबई महापालिकेचा प्रकल्प पर्यावरणप्रेमींच्या विरोधाचे कारण ठरत असतानाच आता मुंबई पोर्ट ट्रस्टने (एमबीपीटी) शिवडीजवळील समुद्राचा मोठा भाग बुजवण्याचा विडा उचलला आहे. शिवडीच्या समुद्रात २३३ एकर जागेवर भराव टाकून सेंट्रल पार्क उभारण्याचा आराखडा पोर्ट ट्रस्टने तयार केला आहे. येत्या मार्चअखेरीपर्यंत याबाबतचा प्रस्ताव पर्यावरणविषयक मंजुऱ्यांसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.

कफ परेड येथील हरित पार्कसाठी समुद्रात भराव टाकण्याचा निर्णय आधीच वादग्रस्त ठरत असताना शिवडीतही असाच प्रयोग होऊ घातल्याने पर्यावरणवाद्यांकडून त्याला विरोध होण्याची शक्यता आहे. पोर्ट ट्रस्टने मात्र या पार्कमध्ये मनोरंजन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईच्या आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या पूर्व सागरी किनारपट्टीचा विकास करण्याच्या उद्देशाने ‘एमबीपीटी’ प्रशासनाने ‘पूर्व सागरतट विकास प्रकल्प’ आखला आहे. गेल्या आठवडय़ात या प्रकल्पाचा विकास आराखडा जाहीर झाला. याअंतर्गत पूर्व किनारपट्टीच्या २८ किलोमीटरच्या पट्टय़ामधील ९६६.३० हेक्टर परिसराचा नागरी मनोरंजन, व्यापार आणि व्यावसायिक अंगाने विकास करण्यात येईल. या प्रकल्पाअंतर्गत शिवडी आणि कॉटन ग्रीन येथील ३६१ एकर क्षेत्रावर पार्क आणि उद्याने तयार करण्यात येणार आहेत. ज्यासाठी जमिनीवरील १२८ एकरचे क्षेत्र वापरण्यात येईल, तर उर्वरित २३३ एकर क्षेत्रासाठी ‘हे’ बंदर आणि ‘हाजी’ बंदरदरम्यान असणाऱ्या समुद्रात भराव टाकण्यात येईल. या भरावाच्या जमिनीवर ‘सिंगापूर मरिना बे’ पार्कच्या धर्तीवर सेन्ट्रल पार्क उभारण्यात येणार आहे. पुण्याच्या ‘केंद्रीय पाणी आणि विद्युत संशोधन संस्थे’ने या प्रकल्पाचा अभ्यास केला असून त्यांच्या परवानगीनंतरच प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती एमबीपीटीमधील प्रकल्पाचे भूनियोजन करणाऱ्या अधिकाऱ्याने दिली. सध्या सोयीसुविधांचे आरेखन सुरू आहे. त्यामुळे आरेखन पूर्ण झाल्यावर आणि जनसुनावणीमधून आलेल्या सूचनांनुसार फेरबदल करून मार्च महिन्याच्या अखेरीस पर्यावरणीय परवानग्यांसाठी प्रकल्प अहवाल  केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले.

भरावासाठी मेट्रोची माती

या भरावासाठी मेट्रो-३ या भूमिगत मेट्रो मार्गिकेच्या उत्खनन कार्यातून निघणाऱ्या मातीचा वापर करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या जवाहर द्वीपवर भराव टाकण्यासाठी मेट्रोची माती शिवडी येथील बीपीटीच्या जमिनीवर टाकली जात आहे. भरावाच्या प्रकल्पाला मिळणाऱ्या परवानग्यांची प्रक्रिया मोठी आहे. त्यामुळे तोपर्यंत शिवडी येथील जमिनीवरच भरावाच्या प्रकल्पासाठी माती साठवली जाईल.

रोपवे आणि मेट्रोची जोड

२३३ एकरांवर पसरणाऱ्या या सेन्ट्रल पार्कच्या परिसरातून शिवडी-एलिफंटा रोपवे जाणार आहे. शिवाय ‘वडाळा ते जनरल पोस्ट ऑफिस’ (जेपीओ) या मेट्रो-४ च्या विस्तारित मार्गिकेचा भूमिगत पट्टादेखील या परिसरातून जाईल. त्यामुळे भविष्यात या परिसरात येणाऱ्या पर्यटकांचा विचार करता परदेशातील पार्कच्या धर्तीवर या सेन्ट्रल पार्कचा विकास केला जाणार आहे.

१५ टक्के जागा व्यावसायिक कामांसाठी

शिवडी जेट्टी ते हाजी बंदर येथील एलबीएस कॉलेजदरम्यान हा भराव टाकण्यात येईल. या भरावामध्ये एलबीएस कॉलेजला कोणत्याही प्रकारचा धक्का लागणार नसल्याचे त्यांनी सांगितले, तर जमिनीवरील १२८ एकर क्षेत्र पुढच्या दीड वर्षांत विकसित करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. या जागेपैकी १५ टक्के जागा व्यावासायिक कामांसाठी भाडेतत्त्वावर दिल्या जातील. यामार्फत झालेल्या आर्थिक फायद्यातून सेन्ट्रल पार्कचा विकास करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button