breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आंदोलनकर्त्या राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांना पालिका प्रवेशद्वारावरच रोखले

पिंपरी (महा ई न्यूज) – शहरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला असून त्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आज गुरुवारी (दि. 27) पाळीव कुत्र्यांसह महापालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्याची तयारी केली होती. त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांनी पालिकेसमोर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. साने यांना गेटवर रोखण्यात आले.

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीचे अ्रध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, राजू मिसाळ, डब्बू आसवानी, मयूर कलाटे, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, जावेद शेख, विक्रांत लांडे, नगरसेविका वैशाली काळभोर, अपर्णा डोके, सुलक्षणा धर, संगीता ताम्हाणे, पौर्णिमा सोनवणे, गीता मंचरकर, विनया तापकीर आंदोलनात सहभागी झाले होते. ‘सरकार हमे डरती है, पोलीस को आगे करती है’ ‘नही चलेगी, दादागिरी नही चलेगी’ अशा घोषणा दिल्या जात आहेत.

नगरसेवकांच्या गाड्या तपासूनच सोडले जात आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना प्रवेशद्वारावर रोखले आहे. आयुक्तांच्या निर्देशानुसार आम्ही गाड्यांची तपासणी करत आहोत, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे.

दत्ता साने म्हणाले, ‘गेल्या अनेक दिवसांपासून शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या आहे. कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून वर्षाला दहा ते 11 हजार लोकांना कुत्री चावतात. जनतेच्या प्रश्नासांठी आंदोलन करत असताना पालिका प्रशासन आमच्यावर दादागिरी करत आहे. पालिकेचे विश्वस्त असूनही पालिकेत सोडले जात नाही. महापालिका आयुक्त आणि सत्ताधारी पोलिसांना हाताशी धरुन दडपशाही, दंडेलशाही करत आहेत’

संजोग वाघेरे म्हणाले, ‘भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मांडली की सत्ताधारी दुसरा विषय काढून मूळ प्रश्नाला नेहमीच्या सवयीप्रमाणे बगल देत आहेत. भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्यात पालिका प्रशासनाला अपयश आले आहे. प्रश्न सोडविण्याऐवजी प्रशासन आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करतेय. महापालिका आयुक्तांनी तर आज कळसच केला आहे. नगरसेवकांनाच गेटवर अडविले आहे’

भाऊसाहेब भोईर म्हणाले, ‘शहरात सर्वत्र भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आहे. तो केवळ राष्ट्रवादीच्या नगरसवेकांच्या प्रभागात नाही. शहराचा प्रश्न आहे. आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन करतो, अन सत्ताधारी गप्प बसतात’. मयूर कलाटे म्हणाले, ‘नगरसेवकांना गेटवर अडविले जात आहे. गाड्या तपासल्या जात आहेत. आम्ही नगरसेवक चोर आहोत का हे आयुक्तांनी सांगावे’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button