..आणि अंत्यसंस्काराच्या काही क्षण आधी ‘मृत’ व्यक्ती झाली ‘जिवंत’
मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे. अंत्यसंस्काराच्या काही क्षण आधी ‘मृत’ व्यक्त जिवंत झाल्याने एका कुटुंबाला धक्काच बसला. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर कुटुंबीय स्मशानभूमीत अंतिम विधीच्या तयारीत होते. तेव्हा काही लोकांना मृतदेहामध्ये हालचाल दिसली. डॉक्टरांनी जेव्हा पुन्हा नस तपासली तेव्हा त्यांना ती व्यक्ती जिवंत असल्याचे आढळून आले.
शब्दप्रताप आश्रमातील ६० वर्षीय हरिसिंह राजपूत यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. २४ तासांत हरिसिंह याना डिस्चार्ज देण्यात येईल, असे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता हरिसिंह यांना एक इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. हरिसिंह यांना अचानक उलटी झाली आणि त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला. त्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी तपासणी करुन राजपूत हे मृत असल्याचे जाहीर केले आणि मृतदेह घरी घेऊन जाण्यास सांगितले.
हरिसिंह यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरांवर चुकीचे इंजेक्शन दिल्याचा आणि रुग्णाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. नातेवाईकांनी पोलिसांनाही बोलावले होते. मोठ्या महत्प्रयासाने पोलिसांनी नातेवाईकांना हरिसिंह राजपूत यांचा मृतदेह घरी घेऊन जाण्यास तयार केले.
घरी हरिसिंह यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु होती. नातेवाईक घरी आले होते. तेव्हा काही लोक मृतदेहाजवळ गेले. त्यावेळी त्यांना हरिसिंह यांची नस सुरु असल्याचे दिसले. इतरांनीही याची खात्री केली. त्यानंतर त्वरीत डॉक्टरांना बोलावण्यात आले. डॉक्टरांनी हरिसिंह हे जिवंत असल्याचे सांगितले. त्यानंतर हरिसिंह यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले.