breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

आणखी एका मराठा आंदोलकाची आत्महत्या

  • दौंडज गावानजीक रेल्वेखाली संपविले जीवन; खिशात सापडले मुख्यमंत्र्यांचे नावे पत्र
  • पुरंदर तालुक्‍यात संतापाची लाट; पोलिसांकडून स्थिती नियंत्रणात

जेजुरी – पुरंदरमधील पिंगोरी गावच्या भूमिपुत्र आंदोलकाने मराठा आरक्षण मागणीसाठी बलिदान दिले. दत्तात्रय तुकाराम शिंदे (वय 40) असे या तरुणाचे नाव आहे. पुणे-कोल्हापूर लोहमार्गावरील दौंडज गावानजीक रेल्वेखाली शुक्रवारी (दि.3) सकाळी 6.22 च्या सुमारास आत्महत्या केली. याबाबत रेल्वे स्टेशनमास्टर विवेक यादव यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात खबर दिली.

पोलिसांना शिंदे यांच्या खिशात सुसाईड नोट मिळाली आहे. या सुसाईड नोट मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण तत्काळ मंजूर करावे अन्यथा दि. 5 ऑगस्टला नीरा नदीत जलसमाधी घेणार असल्याचा मजकूर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आत्महत्या केलेल्या दत्तात्रय शिंदे यांच्या मागे चार वर्षाचा मुलगा, गर्भवती पत्नी, आई, एक अविवाहित भाऊ असा परिवार आहे. दत्तात्रय हे घरातील एकमेव कमवती व्यक्ती होती.

या घटनेचे सविस्तर वृत्त असे की, जेजुरी रेल्वे स्टेशन मास्तर विवेक यादव यांनी दौंडज गावच्या हद्दीत रेल्वे मार्गावर रेल्वेखाली येऊन एक व्यक्ती मरण पावली असल्याची खबर जेजुरी पोलिसांना देताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मृत व्यक्ती दत्तात्रय तुकाराम शिंदे असल्याचे समजले तसेच त्यांच्याकडे प्रिंट केलेली सुसाईड नोटही आढळून आली.

पुरंदर तालुक्‍यात मराठा आंदोलकाची आत्महत्या झाल्याचे समजताच सर्वत्र संतापाची तीव्र लाट उसळली. क्रांती मोर्चातील संदीप जगताप, प्रशांत वांढेकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजयसिंह सावंत, नगरसेवक गणेश जगताप, अजिंक्‍य देशमुख, विक्रम फाळके, कामगार नेते सुरेश उबाळे, निलेश जगताप, राजाराम शिंदे, भरत निगडे, राहुल शिंदे, प्रकाश पवार, प्रकाश शिंदे आदी शेकडो आंदोलकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा पेच त्वरित सोडवावा, आत्महत्या केलेल्या शिंदे यांच्या परिवाराला 50 लाख रुपयांची आर्थिक मदत त्वरित जाहीर करावी, त्यांची पत्नी किंवा भाऊ यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.

संतप्त वातावरण पाहून उपायुक्त सुहास गरुड, पोलीस उपविभागीय अधिकारी आण्णासाहेब जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने, तहसीलदार सचिन गिरी, मंडलाधिकारी डी. एस. यादव, राजाराम भामे आदी अधिकाऱ्यांसह तहसीलदार सचिन गिरी यांनी पोलीस ठाण्यात येत कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे, संयम ठेवण्याचे आवाहन केले.

आत्महत्येचा मार्ग अवलंबू नये…
मराठा आरक्षण मागणीतील समाजबांधवांनी लोकशाहीच्या मार्गाने कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून आंदोलन करावे. मात्र, यासाठी कोणी आत्महत्येसारखा घातक मार्ग अवलंबू नये. आपल्यावर आपले सर्व कुटुंब अवलंबून आहे, याचा विचार करावा. आरक्षण मिळवण्याचे इतर मार्ग आहेत, असे भावनिक आवाहन करीत मुख्यमंत्री फडणवीस यांनीही समाजाचा अंत पाहू नये, असे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष लोकेश सावंत यांनी केले सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button