अल्पवयीन मुलांकडून जिवंत काडतुसासह पिस्तूल जप्त
पिंपरी – दोन अल्पवयीन मुलांकडून तीन जिवंत काडतुसासह एक पिस्तूल जप्त करण्यात आले. ही कारवाई पिंपरी पोलिसांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ आज (मंगळवारी) दुपारी बारच्या सुमारास केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ एका टपरीवर दोन अल्पवयीन मुले थांबली असून त्यांच्याजवळ एक पिस्तूल असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पिंपरी पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता, एका मुलाच्या कमरेला लोखंडी पिस्तूल आणि दुस-या मुलाजवळ तीन जिवंत काडतुसे मिळाली. पोलिसांनी एकूण 25 हजार 600 रुपयांचा ऐवज जप्त केला. ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांविरोधात यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये दोघेही फरार होते.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, रामदास मुंढे, पोलीस हवालदार सुहास गुजर, पोलीस हवालदार अंकुश यादव यांच्या पथकाने केली.