breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

अटक वॉरंट रद्द करण्याची चोक्‍सीची विशेष न्यायालयाकडे मागणी

मुंबई – पंजाब नॅशनल बॅंकेमध्ये कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारातील एक आरोपी आणि गीतांजली जेम्सचा प्रमोटर मेहुल चोक्‍सी याने विशेष न्यायालयामध्ये आपल्याविरोधातील अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्यासाठी अर्ज केला. आपल्याला भारतात पुन्हा आणले गेले तर जमावाकडून आपली हत्या केली जाण्याची भीतीही त्याने व्यक्‍त केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक विशेष न्यायालयाने चोक्‍सीवर सक्‍तवसुली संचलनालयाने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेऊन यावर्षी मार्च आणि जुलै महिन्यात चोक्‍सीच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे.

आपल्या पूर्वाश्रमीच्या कर्मचाऱ्यांकडून आणि कर्जदारांकडून जीवाला धोका आहे. तसेच जर तुरुंगात ठेवल्यास तुरुंग कर्मचारी आणि अन्य कैद्यांकडूनही आपली हत्या केली जाऊ शकते, अशी भीती त्याने आपल्या अर्जामध्ये व्यक्‍त केली आहे. गीतांजली जेम्स या कंपनीचा कारभार चालणे अशक्‍य झाले आहे. या कंपनीतील कर्मचाऱ्यांचे पगार आणि कर्जदारांना त्यांचे पैसेही परत दिले जाऊ शकलेले नाहीत. हे सर्वजण आपल्यावर संतापलेले आहेत. त्यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे त्याने म्हटले आहे.

चोक्‍सीला जर भारतात आणले गेले आणि तुरुंगात ठेवल्यास तुरुंग कर्मचाऱ्यांकडून खंडणीसाठी धमकावले जाण्याची आणि अन्य कैद्यांकडून त्याची हत्या होण्याचीही शक्‍यता आहे. आपण कधीही तपासापासून दूर पळण्याचा प्रयत्न केला नाही. तपास अधिकाऱ्यांना दरवेळी आपण प्रतिसाद दिला आहे. प्रकृती अस्वास्थ्य, रद झालेला पासपोर्ट आणि जीवाला धोका असल्यानेच भारता येऊ शकत नसल्याचे चोक्‍सीने आपल्या अर्जात म्हटले आहे.

भारतात जमावाकडून हत्या होण्याच्या काही घटना घडल्या आहेत. नागरिकांनी कायदा हातात घेऊन भरदिवसा हत्या करण्याचे प्रमाण वाढत आहे, याचाही दाखला चोक्‍सीने आपल्या अर्जात दिला आहे.

चोक्‍सीवर सीबीआयने भ्रष्टाचाराचा खटलाही दाखल केला आहे. त्यासंदर्भातही चोक्‍सीने गेल्या महिन्यात अशाच स्वरुपाचा अर्ज सीबीआय न्यायालयामध्ये दाखल केला आहे.

चोक्‍सीच्या या अर्जावर “पीएमएलए’चे विशेष न्यायाधीश एम.एस. आझमी यांनी सक्‍तवसुली संचलनालयाचे उत्तर मागितले आहे. या प्रकरणाची सुनावणी 18 ऑगस्टला होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button