breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

अजित पवारांच्या हस्ते शिवभोजन थाळीचे उद्घाटन, पिंपरी-चिंचवडमध्येही सुरू

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात आज रविवारी (दि. २६) प्रजासत्ताक दिनानिमित्त ११ ठिकाणी शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सकाळी अकराच्या सुमारास पुणे महापालिकेच्या उपहारगृहात शिवभोजन थाळीचे उद्घाटन करण्यात आले. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अशा एकूण ११ ठिकाणी ही थाळी सुरू करण्यात आली.

शिवसेना सत्तेत आल्यानंतर गरिबांना दहा रुपयांत शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्याचे अभिवनच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर दिले होते. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्या टप्प्यात ११ ठिकाणी ही योजना कार्यान्वित करण्यात आले. तयार स्वयंपाकगृह आणि २५ माणसे एकाचवेळी जेऊ शकतील, अशी व्यवस्था असणाऱ्यांना या योजनेचा ठेका देण्यात आला आहे. आगामी काळात बचतगट, खाणावळी, भोजनालये येथे ही योजना सुरू करण्यात येईल.

शिवभोजन थाळी घेणाऱ्याचे छायाचित्र, नाव आणि मोबाइल क्रमांक घेण्यात येणार आहे. त्यासाठी चालकाला शासनाकडून ‘महा अन्नपूर्णा ’ हे अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रत्येक केंद्रात रोज किमान ७५ आणि कमाल १५० जणांनाच या योजनेअंतर्गत जेवण देण्यात येईल. रोज दुपारी बारा ते दोन या वेळेतच ही योजना कार्यान्वित राहणार असून एका व्यक्तीला एकच थाळी मिळणार आहे.

शिवभोजन थाळी केंद्रचालकांना शासनाकडून प्रत्येक थाळीमागे ४० रुपये अनुदान मिळणार असून दहा रुपये ग्राहकाकडून मिळणार आहेत. या योजनेसाठी पुणे शहर अन्नधान्य पुरवठा विभागाला ५४ लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे, अशी माहिती शहर अन्नधान्य पुरवठा अधिकारी अस्मिता मोरे यांनी शुक्रवारी दिली. हे अनुदान पुरवठा विभागाकडून चालकाच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button