breaking-newsराष्ट्रिय

अगली बार भी मोदी सरकार?, ३३३ जागांचे लक्ष्य

२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत ३०३ जागांवर विजय मिळवणाऱ्या भाजपाने आता पाच वर्षांनंतर म्हणजेच २०२४ मधील निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. २०२४ मधील निवडणुकीत भाजपाने दक्षिणेकडील राज्यांवर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवले असून या दिशेने भाजपाने कामही सुरु केले आहे. २०२४ मध्ये ३३३ जागांवर विजय मिळवण्याचे भाजपाचे लक्ष्य आहे.

आंध्र प्रदेश आणि त्रिपुरा या राज्यांमधील भाजपाचे प्रभारी सुनील देवधर यांनी हिंदुस्तान टाइम्स या वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत २०२४ मधील निवडणुकांसाठी काय रणनिती असेल याचा उलगडा केला. पश्चिम बंगाल ते तामिळनाडू या किनारपट्टीवर आम्ही लक्ष केंद्रीत करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. २०२४ साठी आम्ही ३३३ जागांचे लक्ष्य ठेवले असून हे लक्ष्य गाठण्यासाठी भाजपाला ‘हिंदी भाषिकांचा पक्ष’ ही प्रतिमा पुसावी लागेल, असे त्यांनी नमूद केले.

दक्षिणेतील राज्यांपैकी कर्नाटकात भाजपाने चांगली कामगिरी केली आहे. कर्नाटकातील २८ पैकी २५ जागांवर पक्षाने विजय मिळवला. तर तेलंगणमधील १७ पैकी ४ जागांवर विजय मिळवला. पण तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये पक्षाला एकाही जागेवर विजय मिळालेला नाही.

पश्चिम बंगालच्या धर्तीवर भाजपाने या तीन राज्यांमध्ये लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवले आहे. यासाठी बुथ पातळीवर पन्नाप्रमुख नेमण्यात आले असून या राज्यांमध्ये भाजपा युती करण्याऐवजी पक्षाचा विस्तार कसा होईल, यावर भर दिला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

केरळमध्येही भाजपाने रणनिती आखली आहे. डाव्या पक्षांकडून काँग्रेसकडे वळालेल्या मतदारांवर भाजपाने लक्ष केंद्रीत केल्याचे समजते. शबरीमला प्रकरणानंतर केरळमधील डाव्या पक्षांना मतदारांचा पाठिंबा मिळणार नाही असे वाटत होते. लोकसभा निवडणुकीत डाव्या पक्षांचे मतदार काँग्रेसकडे वळले. याचा आढावा घेऊन पुढील पावले उचलले जातील, असे भाजपामधील सूत्रांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button