‘हिना आणि कोमोलिकामध्ये हेच तर साम्य’ – शिल्पा शिंदे

बिग बॉस ११ ची विजेती शिल्पा शिंदे आणि उपविजेती हिना खान या दोघींमध्ये कायमच कॅट फाईट पाहायला मिळत असते. बिग बॉसच्या घरातदेखील या दोघांची एकमेकींशी कधीच पटलं नाही. इतकच नाही तर घरातून बाहेर पडल्यानंतरही या दोघींमधील वाद कमी झालेले नाही. एकमेकींना नाव ठेवण्यासाठी त्या कायमच संधी शोधत असल्याचं दिसत असून यावेळी शिल्पा शिंदेने पुन्हा एकदा हिनाला टोमणा मारल्याचं समोर आलं आहे.
हिना खान लवकरच छोट्या पडद्यावरील आगामी ‘कसोटी जिंदगी की २’ या मालिकेमध्ये झळकणार आहे. या मालिकेमध्ये हिना कोमोलिकाची भूमिका करणार असून तिच्या या भूमिकेविषयी शिल्पाला तिचं मत विचारण्यात आलं होतं. यावर शिल्पाने उत्तर देत थेट हिनावर टीका केली आहे.
‘कसोटी जिंदगी की’मध्ये कोमोलिकाचं जे पात्र होतं. त्याप्रमाणेच हिनाचा स्वभाव आहे. हिना बिग बॉसच्या घरातही कोमोलिकाप्रमाणेच वागत होती. त्यामुळे हिना या मालिकेत चांगलंच काम करेल. या दोघींच्या स्वभावात हेच तर साम्य आहे, असं शिल्पा म्हणाली.
पुढे ती असंही म्हणाली, हिना एक उत्तम अभिनेत्री आहे. तसंच ती अनेक वेळा साऱ्यांशी वाद घालत असल्यामुळे तिला नकारात्मक भूमिका करणं फार अवघड जाणार नाही. दरम्यान, हिना आणि शिल्पामधील ही कॅटफाईट बिग बॉसच्या ११ व्या पर्वापासून सुरु झाली असून त्यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत असल्याचंच पाहायला मिळत आहे.