राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याचा दावा

अमेठी, – ‘काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्यावर स्नायपरनं गोळ्या झाडण्याचा प्रयत्न झाला,’ असा दावा काँग्रेसनं केला आहे. दरम्यान, या प्रकरणामध्ये काँग्रेसनं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहिलं असून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घडलेली सर्वात मोठी घटना आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बुधवारी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. त्यावेळी प्रियांका गांधी, रॉबर्ट वाड्रा आणि त्यांची दोन मुलं देखील हजर होती. तर, केरळमधील वायनाडमधून देखील काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेकरता उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सध्या राहुल गांधी प्रचारामध्ये व्यस्त आहेत.
काय कारवाई करणार
काँग्रेसनं राजनाथ सिंह यांना पत्र लिहिलं असून त्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया गृहमंत्रालयाकडून आलेली नाही. त्यामुळे गृहमंत्रालय आता काय कारवाई करणार याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी अनेक वेळा गर्दीमध्ये मिसळून देखील लोकांशी संवाद साधतात. त्यावेळी सुरक्षेची देखील पूर्ण काळजी घेतली जाते. पण, काँग्रेसनं केलेल्या दाव्यामुळे आता खळबळ उडाली आहे.