राज्यासह पुण्याचे तापमान पुन्हा वाढले; पारा 40.7 अंशावर

पुणे: राज्यासह पुण्याचे तापमानात आज वाढ झाली आहे. पुण्याचे कमाल तापमान आज 40.1 अंश इतके तर लोहगाव येथे 42 अंश पा-याची नोंद झाली आहे. राज्यात विदर्भातील ब्रम्हपुरीत 45.9 अंश इतक्या सर्वोच्च तापमानाची नोंद करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पारा 39.7 अंश इतका उतरल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा पारा वाढल्याने लोकांना मोठ्या प्रमाणात उकाडा सहन करावा लागत आहे.
पारा 40 अंशाच्या वर गेल्याने नागरिकांना उन्हाचा चांगलाच चटका सहन करावा लागत आहे. यामुळे पुणेकर चांगलेच घामाघूम झाले. उन्हाच्या कडाक्यामुळे भरदुपारी पुण्यातील अनेक रस्त्यांवर चांगलाच शुकशुकाट जाणवला. त्यामुळे उन्हापासून संरक्षणासाठी नागरिकांकडून संकोट, स्कार्फ, रुमाल आदींच्या वापराकडे भर दिल्याचे दिसून आले.
तर उन्हाळ्यामुळे ऊसाचा रस, निंबू पाणी, सरबत, कोल्डड्रिंक आदी घेण्याकडेही नागरिकांचा कल वाढत आहे.