युरोपात घुसखोरीच्या प्रयत्नांतील 50 जणांना जलसमाधी

ट्युनिस – बेकायदेशीर मार्गाने युरोपात घुसखोरी करण्याचे अनेक नागरीकांचे प्रयत्न अद्याप सुरूच असून अशाच एका प्रयत्नांत निर्वासितांची एक बोट भूमध्य समुद्रात उलटल्याने किमान 50 जण मरण पावल्याचे वृत्त आहे. त्यातील 47 मृतदेह ट्युनिशीयाच्या किनाऱ्यावर आढळून आले आहेत. 68 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तथापी या दुर्घटनेत नेमके किती जण मरण पावले आहेत याचा अजून अंदाज आलेला नाही.
सीरिया व अन्य देशांमध्ये इस्लामिक कट्टरपंथीयांनी जो धुमाकुळ घातला आहे त्याला कंटाळून तसेच चांगले भवितव्य साकारण्यासाठी भूमध्य समुद्रा मार्गे आज अनेक जण युरोपात घुसखोरी करीत आहेत. त्या प्रयत्नांत आत्तापर्यंत अनेक दुर्घटना झाल्या आहेत पण अजून हा घुसखोरीचा प्रकार मात्र कमी झालेला नाही.
आजच्या घटनेच्या संबंधात माहिती देताना एका निर्वासित प्रवाशाने सांगितले की आमच्या बोटीला भेग पडल्याने ती बोट बुडून ही दुर्घटना घडली. आमच्या बोटीत किमान 180 जण असावेत असा अंदाज त्याने व्यक्त केला आहे. हे निर्वासित घुसखोर तुर्की मार्गे युरोपात घुसण्याचा प्रयत्न करतात.