महावितरणीची “मोबाइल ऍप’ सुविधा हायटेक

- सव्वाकोटीहूनही अधिक वीज ग्राहक करतात या ऍपचा वापर
पुणे – राज्यभरातील वीजवाहिन्या आणि वीजयंत्रणांची पायाभूत सुविधा सक्षम केल्यानंतर वीज ग्राहकांना अधिक दर्जेदार आणि हायटेक सुविधा देण्याचा निर्णय महावितरण प्रशासनाने घेतला आहे. विशेष म्हणजे प्रशासनाच्या या हायटेक वाटचालीला सर्वच प्रकारच्या वीज ग्राहकांनी अपेक्षेपेक्षाही अधिक प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेली “मोबाइल ऍप’ सुविधा चांगलीच हायटेक झाली असून राज्यभरातील तब्बल सव्वाकोटीहूनही अधिक वीज ग्राहक या योजनेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे या ग्राहकांना आपल्या वीजजोडांची माहिती तात्काळ मिळणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे या सुविधेला ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत असल्याने अधिकाअधिक ग्राहकांना यामध्ये सहभागी करुन घेण्याचा संकल्प प्रशासनाने केला आहे.
गेल्या काही वर्षांच्या कालावधीत राज्यातील वीजयंत्रणेची पायाभूत सुविधा अधिक भक्कम करण्यासाठी महावितरण प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी प्रशासनाच्या वतीने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. प्रशासनाच्या या अथक परिश्रमामुळेच वीज ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा मिळत असून अखंडित वीजपुरवठा होत आहे. मात्र,हे वास्तव असतानाच स्पर्धेच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात हायटेक सुविधा देण्यास प्रशासनाला अपेक्षित यश आले नव्हते, याची दखल घेऊन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी पदाची सूत्रे हाती घेताच तंत्रज्ञान अधिक सक्षम करण्यावर सर्वाधिक भर दिला.
राज्यभरातील सर्व प्रकारच्या ग्राहकांना त्यांच्या खात्याची सर्व माहिती व्हावी यासाठी संजीव कुमार यांनी या ग्राहकांना “मोबाइल ऍप’ ही संकल्पना मांडली. त्याची माहिती ग्राहकांना व्हावी, यासाठी परिमंडलांच्या कार्यालयांसह शाखा कार्यालयांवरही याबाबतची मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. त्यांची ही संकल्पना तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही घेतलेल्या परिश्रमामुळे अल्पावधीतच ही योजना शहरी भागांसह खेड्यापाड्यातही जाऊन पोचली. या ऍपमुळे राज्यभरातील ग्राहकांना त्यांच्या वीजमीटर, वीजबील तसेच अन्य बाबींविषयी माहिती मिळणे शक्य झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्यभरातील अधिकाअधिक वीज ग्राहकांना या योजनेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांनी “प्रभात’ शी बोलताना दिली.