breaking-newsपुणे

ऑनलाईन शिक्षक बदली प्रक्रियेत सावळा गोंधळ

  • आढळून आल्या अनेक त्रुटी : शिक्षकांना सहन करावा लागतोय मनस्ताप
    असीम गुप्ता यांची भेट घेऊन जिल्हा परिषद दाद मागणार

पुणे – राज्य शासनाने नव्याने राबविलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेत सावळा गोंधळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अनेक शिक्षकांना बदलीचे ठिकाणच मिळाले नसून, ज्यांना मिळाले त्याठिकाणी पदच रिक्त नाही. त्यामुळे शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विस्थापित शिक्षकांसह पती-पत्नी एकत्रीकरण, पसंतीच्या विरोधात मिळालेल्या शाळा अशा, अनेक त्रुटी ऑनलाइन बदली प्रक्रियेत आढळून आल्या आहेत. या संदर्भात राज्याच्या ग्रामविकास खात्याचे सचिव असीम गुप्ता यांची भेट घेऊन त्याबाबत जिल्हा परिषद दाद मागणार आहे, अशी माहिती उपाध्यक्ष तथा शिक्षण विभागाचे सभापती विवेक वळसे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

2017-18 या वर्षासाठी जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, उपशिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्यात आल्या. 6 हजार 43 शिक्षकांच्या बदल्यांपैकी 5 हजार 388 शिक्षकांना बदलीचे ठिकाण मिळाले; तर 655 शिक्षकांना शाळेचे ठिकाणच मिळाले नाही. दरम्यान, ज्या शिक्षकांना बदल्या मिळाल्या त्यांच्यातही अनेक त्रुटी असून, ज्या ठिकाणी दोनच जागा रिक्त आहेत त्याठिकाणी तीन ते चार जणांना शाळा मिळाली आहे. पती-पत्नी एकत्रीकरण यासह अनेक तक्रारी शिक्षकांच्या आहेत. या तक्रारी जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये गुरुवारी (दि.31) बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्ह्यातील चारशेहून अधिक शिक्षक उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपत मोरे उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यात यंदा राज्य सरकारच्या आदेशानुसार ऑनलाइन बदल्या करण्यात आल्या. राज्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पध्दतीनेबदल्या झाल्या आहेत. मात्र, त्याचा फटका अनेक शिक्षकांना बसला असून, जिल्ह्यातून तक्रारींचा पाढा वाचला जात आहे. बदली झालेल्यांपैकी 655 शिक्षक विस्थापित झाले आहेत. म्हणजेच त्यांना शाळाच मिळाल्या नाहीत. विस्थापितांमध्ये 2 मुख्याध्यापक, 51 पदवीधर शिक्षकांसह 602 उपशिक्षकांचा समावेश आहे. त्याशिवाय महिलांसाठी अवघड क्षेत्राच्या ठिकाणी बदली मिळू नये असे असताना संगणकावर अवघड ठिकाणी बदली करण्यात आल्या आहेत. शिक्षकांनी पसंतीक्रम देऊनही त्यांच्या पसंतीच्या शाळा अथवा गावांमध्ये त्यांच्या बदल्या झाल्या नाहीत. पती-पत्नीच्या एकत्रीकरणाच्या नियमांचे पालन झालेले दिसत नाही.

काही शाळांवर मंजूर पदांपेक्षा किंवा रिक्त पदापेक्षा जास्त शिक्षक बदलीने रुजू झाल्यास त्यांच्या वेतनाचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. तसेच ऑनलाइन प्रक्रियेसाठी भरावयाच्या अर्जामध्ये 20 ठिकाणची पसंती क्रम द्यावयाचे होते. अर्ज भरतानाही अनेकांच्या चुका झाल्या आहेत. या संदर्भात शिक्षकांनी तक्रारी केल्या असून त्याची दखल घेऊन ग्रामविकास खात्याचे सचिव असीम गुप्ता यांची लवकरच भेट घेणार आहोत. अन्याय झालेल्या शिक्षकांसाठी त्यांच्याकडे दाद मागितली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button