मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर निर्णय नाही

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पेट्रोल-डिझेलची वाढती दरवाढ रोखण्याबाबत निर्णय होईल अशी आशा होती. मात्र, ही आशा फोल ठरली असून इंधन दरवाढीबाबत बैठकीत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. उलट, पेट्रोलिअम उत्पादनातून मिळणाऱ्या अबकारी कराचा वापर महामार्ग आणि एम्ससारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रुग्णालयांच्या निर्मितीसाठी करण्यात येतो. हा कर देशाच्या विकासासाठी आवश्यक आहे, असे केंद्रीय विधी मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनतंतर ते माध्यमांशी बोलत होते. पत्रकार परिषदेत पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना प्रसाद यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार नाहीत असेच संकेत दिले आहेत. कर आणि विकासाचा मुद्दा त्यांनी सांगितला असला तरी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे महागाईत वाढ होणार असल्याच्या मुद्द्यांकडे त्यांनी सपशेल दुर्लक्ष केले.
या दरवाढीविरोधात विरोधक आणि जनतेतून रोष व्यक्त केला जात आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार असल्याने याबाबत निश्चित तोडगा निघू शकतो अशी सर्वसामान्यांना आशा होती. मात्र, ती फोल ठरली आहे.