भुशी डॅम परिसरात पर्यटकांना मज्जाव; सुरक्षेच्या कारणास्तव निर्बंध

लोणावळा: लोणावळा खंडाळा परिसरात कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेल्या लोणावळ्यातील भुशीडॅमच्या पाण्यात मोठी वाढ होऊन डॅमच्या पायऱ्यांवरून पाण्याचा मोठा प्रवाह वेगाने वाहत आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पोलिस प्रशासनाने शनिवारी सकाळपासून पर्यटकांना डॅमच्या पायऱ्यांवर जाण्यास निर्बंध घातले आहेत.
मागील तीन दिवसांपासून लोणावळा खंडाळा परिसरासह मावळात मुसळधार व जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळं भुशी डॅममधील पाण्याची पातळी वाढली असून डॅमच्या पायऱ्यांवरून पाण्याचे लोट वाहत आहेत. खबरदारी म्हणून पर्यटकांना पायऱ्यांवर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळं या परिसरात छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्यांच्या धंद्यावर मोठा परिणाम झाला असून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, पाण्याचा प्रवाह ओसरला की पर्यटकांना पायऱ्या जाण्याची मुभा दिली जाईल, असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
तब्बल दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाने तीन दिवसांपूर्वी लोणावळा, खंडाळ्यासह मावळात दमदार हजेरी लावली आहे. यामुळे मावळात पावसाअभावी मंदावलेल्या भात लागवडीला पुन्हा वेग आला असून, बळीराजा कमालीचा सुखावला आहे. मागील ४८ तासांत लोणावळ्यात सुमारे ३१२; तर पवनाधरण क्षेत्रात २४१ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी पहाटेपासून लोणावळा व खंडाळा परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.