बॉलिवुड व हॉलिवुडच्या चित्रपटांना पाकिस्तानात तात्पुरती बंदी

कराची – पाकिस्तानात बॉलिवुड व हॉलिवुडचे चित्रपट दाखवण्यास ईदच्या काळापुरती बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानी चित्रपट निर्माता संघटनेने केलेल्या मागणीनुसार तेथील सरकारने हा निर्णय घेतला आहे. या संबंधात जी अधिसूचना तेथील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रकाशित केली आहे त्यात म्हटले आहे की ईदच्या दोन दिवस आधी आणि त्यानंतर पंधरा दिवसांसाठी पाकिस्तानात भारतीय आणि अन्य विदेशी चित्रपटांच्या प्रदर्शनांना बंदी असेल.
पाकिस्तानातील चित्रपट निर्माते, वितरक आणि सिनेमा निर्मीती संस्थांनी सरकारकडे एकत्रितपणे ही मागणी केली होती. त्यानुसार स्थानिक चित्रपट व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी ही बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानी चित्रपटांपेक्षा तेथील जनता भारतीय आणि हॉलिवुडच्या चित्रपटांनी अधिक प्रतिसाद देते त्यामुळे पाकिस्तानी चित्रपटांचे नुकसान होते असा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे. अनेक पाकिस्तानी चित्रपट ईदसाठी प्रदर्शनाला तयार ठेवण्यात आले आहेत तसेच अनेक भारतीय चित्रपटही ईदसाठी येथे मुद्दाम थांबवून ठेवण्यात आले होते.