मनोरंजन

‘बाहुबली’ को रोखनेवाला पैदा नहीं हुआ मामा!

नागपूर : ‘जब तक तुम मेरे साथ हो मुझे मारनेवाला पैदा नहीं हुआ मामा’… बाहुबलीच्या या डायलॉगने जगभरातील चित्रपट रसिकांना भुरळ घातली. पण, आता कमाईची स्थिती बघता ‘बाहुबली को रोखनेवाला पैदा नहीं हुआ’ असेच म्हणण्याची वेळ आली आहे. पहिल्या आठवड्यात जगभरातून एक हजार कोटींचा गल्ला जमविणाऱ्या या चित्रपटाने अवघ्या दहा दिवसांमध्ये विदर्भातून साडेसहा कोटी रुपयांची ‘ऐतिहासिक’ कमाई केली आहे. ‘बाहुबली’ मॅनिया आणखी महिनाभर चालेल, असा अंदाजही व्यक्त होत आहे.

यावर्षी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत 33 हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले. यापैकी एखाददुसरा अपवाद सोडला तर इतर चित्रपट कधी आले आणि कधी गेले, याची खबरही कुणाला लागली नाही. चित्रपटगृहांना नुकसानही सहन करावे लागले. हे नुकसान भरून काढण्यासाठी ‘बाहुबली’ची प्रतीक्षा करणाऱ्या चित्रपटगृहांच्या मालकांची अवस्था ‘देवसेना’सारखी झाली होती. पण, ‘बाहुबली’ने या चार महिन्यांचाच नव्हे, तर गेल्या चार, पाच, सहा दशकांमधील सर्व विक्रम मोडीत काढून इतिहास रचला आहे. पहिल्या दहा दिवसांत साडेसहा कोटी रुपये एकट्या विदर्भातून कमावणाऱ्या ‘बाहुबली’ला मागे टाकायचे असेल, तर ‘बाहुबली’चाच तिसरा भाग यावा लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

नागपुरातील बारा सिनेमागृहांमध्ये पहिल्या आठवड्यात दरदिवशी जवळपास शंभर प्रयोग झाले. मल्टिप्लेक्‍सने सकाळी साडेसातपासून शो सुरू केले, तर काही सिंगल स्क्रीनला सकाळी 9.30 चा अतिरिक्त शो लावण्यात आला. ‘ऐसा मौका फिर कहॉं मिलेगा’ असा विचार करून थिएटर मालकांनी जेवढा जास्त गल्ला जमवता येईल, तेवढा जमवला.
नागपुरातील सिनेमागृहांच्या इतिहासात ‘मुगले आजम’, ‘शोले’ आणि ‘जय संतोषी मॉं’ हे तीन ‘माइलस्टोन’ मानले जातात. यात ‘बाहुबली’चा समावेश झाला आहे. कमाई आणि गर्दीच्या निकषांमध्ये तर ‘बाहुबली’ पहिल्या स्थानावर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कथा, जॉनर, काळ, तंत्रज्ञान, ग्लॅमर, स्टारकास्ट, ऍक्‍शन… या सर्व निकषांवर तुलना केली तरी ‘बाहुबली’ची बरोबरी करणे अवघड आहे. त्यामुळेच जवळपास 35 वर्षांमध्ये ‘जय संतोषी मॉं’नंतर सिनेमागृहांच्या बाहेर ज्या रांगा बघायला मिळाल्या नाहीत, त्या ‘बाहुबली’च्या निमित्ताने बघायला मिळाल्या. अर्थात, आज ‘ऑनलाइन बुकिंग’ची सोय असल्याने तिकिटांसाठी होणाऱ्या रांगांचा विक्रम ‘बाहुबली’ला मोडता आला नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button