पाकिस्तानच्या माऱ्यात सहा जण जखमी

जम्मू – पाकिस्तानी रेंजर्सच्या जवानांनी अर्निया सेक्टरच्या लगत भारतीय हद्दीत केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात सहा जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या माऱ्याला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्त्युत्तर देणे सुरू केले त्यानंतर दोन्ही बाजूंकडून भीषण मारा सुरू झाला. दुपारी उशिरापर्यंत ही चकमक सुरू होती. या चकमकीमुळे स्थानिक नागरीकांमध्ये मोठी घबराट उडाली असून तेथील अनेक नागरीकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. कालच पाकिस्तानी बाजूकडून विनंती करण्यात आल्याने सीमा सुरक्षा दलांनी आपला गोळीबार थांबवला होता.
भारतीय बाजूकडून करण्यात आलेल्या तुफानी माऱ्यामुळे पाकिस्तानचे जवान जेरीला आले होते व घायकुतीला येत त्यांनी हा मारा थांबवण्याची विनंती भारतीय अधिकाऱ्यांना केली होती. त्यानुसार भारताने हा मारा थांबवल्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी त्यांनी पुन्हा फणा काढला. पाकिस्तान कडून डागण्यात आलेल्या तोफ गोळ्यांपैकी एक गोळा जम्मूच्या हद्दीतील एका पोलिस ठाण्यासमोरच पडल्याने या ठाण्याचा प्रमुख यात जखमी झाला आहे.
भारतीय हद्दीतील एकूण सहा जण यात जखमी झाले आहेत. या वाढत्या चकमकींच्या प्रमाणामुळे भारत-पाक सीमेपासून पाच किमी अंतरावरील सर्व शाळा दक्षतेचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आल्या आहेत. आज सकाळी सात वाजल्यापासून दोन्ही बाजूंकडील चकमकींना सुरूवात झाल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली.