नाठाळ भाजपला मजदूर संघटनाच ताळ्यावर आणेल – खासदार श्रीरंग बारणे

खासदार बारणे यांच्या हस्ते 200 कामगारांना अर्थसहाय
पिंपरी- बांधकाम कामगार अत्यंत हालाखीचे जीवन जगत असताना कामगार कल्याण निधी शासनाकडे पडून आहे. परिणामी कामगारांना सोई सुविधा देण्यात आडकाठी येत आहे. कामगारांविषयी अनास्था असलेल्या नाठाळ भाजप सरकारला महाराष्ट्र मजदूर संघटनाच ताळ्यावर आणेल, असा विश्वास शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.
शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजने अंतर्गत अवजारे खरेदी करण्यासाठी बांधकाम कामगारांना खासदार बारणे यांच्या हस्ते अर्थसहाय्य करण्यात आले. कार्ला येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. यामध्ये 200 कामगारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. त्यावेळी खासदार बारणे बोलत होते. महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष आणि भारतीय कामगार सेना महासंघाचे उपाध्यक्ष इरफान सय्यद, अप्पर कामगार उपायुक्त बाळासाहेब वाघ, सरकारी कामगार अधिकारी रोहन रुमाले, सरकारी अधिकारी यास्मिन शेख, मुजावर, संगीता कळमकर, शिवसेना तालुका प्रमुख राजेश खांडभोर, उपसभापती शरद हुलावले, सरपंच सागर हुलावळे आदी उपस्थित होते.
बारणे म्हणाले की, बांधकामांना परवानगी देताना नियोजित बांधकामाच्या खर्चाच्या एक टक्का रक्कम ‘सेझ’ अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांकडे जमा करण्यात येते. हा जमा होणारा पैसा कामगारांच्या हितासाठी वापरण्यात यावा, असा शासनाचा मानस आहे. मात्र, हा पैसा कामगारांना मिळवून देण्यासाठी कोणीही प्रयत्न करीत नाही. त्यामुळे सध्या शासनाकडे ‘सेझ’अंतर्गत 10 हजार कोटी रुपयांचा निधी पडून आहे. मात्र, त्याचा लाभ कामगारांना व्हावा, यासाठी शासनाची उदासिनता दिसून येत आहे. हा निधी तळागाळातील कामगारांपर्यंत पोहचावा यासाठी महाराष्ट्र मजदूर संघटना सातत्याने कटिबद्ध राहील, असा विश्वास देखील बारणे यांनी व्यक्त केला.
शिवसेनेचे कामगार नेते इरफान सय्यद म्हणाले, “महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने बांधकाम साईटवर जाऊन कामगारांची नोंदणी केली आहे. त्यामुळे केवळ गरजू आणि ख-या कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. नोंदणीकृत कामगारांसोबत संघटना सातत्याने संपर्क करीत आहे. त्यांच्या अडचणींना सोडविण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत.