देशाला सर्वात जास्त कष्ट करणारा पंतप्रधान मिळाला- अमित शहा

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारला आज चार वर्ष पूर्ण झाल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सरकारने केलेल्या कामांचे कौतुक केले. मोदी सरकारने घराणेशाही, जातीयवाद संपवून ‘पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मेंस’ धोरण अवलंबले आहे. खऱ्या अर्थानं भाजपने देशाला सर्वात जास्त कष्ट करणारा पंतप्रधान दिला असून तो १५ -१६ तास काम करतोय’, अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली.
केंद्रातील मोदी सरकारला आज ४ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत शहा यांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं उधळली तर काँग्रेसवर जोरदार टीका केली. गरीबी आणि भ्रष्टाचाराला हटवण्याचं धोरण मोदी राबवित आहेत. तर मोदींना हटवण्यासाठी विरोधक मोदींच्या विरुद्ध खोटा प्रचार करीत आहेत, असा आरोप केला. देशातील जनता ही भक्कमपणे आमच्यासोबत उभी असून २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर येईल, असं अमित शहा म्हणाले.