तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातील पुरातन नाणी गायब

उस्मानाबाद – महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील पूर्ण पीठ असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातील 71 पुरातन नाणी गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी याप्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. 2005 ते 2018 च्या पंचनाम्यात नाणी गायब झालेचे सिद्ध झाले आहे. किशोर गंगणे यांनी टाकलेल्या माहिती अधिकारात ही धक्कादायक बाब उघड झाली आहे.
तुळजाभवानी मातेला निजाम, औरंगजेब, पोर्तगीज यांच्यासह बिकानेर, उदयपूर, लखनौ, बडोदा आणि इंदूर या घराण्यांतील राजे महाराजे यांनी त्यांच्या चलनातील पुरातन नाणी देवी चारणी अर्पण करण्यात आले आहेत. या नाण्याची अधिकृतरित्या नोंद तुळजाभवानी मंदिर संस्थेच्या रेकॉर्डमध्ये 1980 पर्यंत होती. मात्र 2005 आणि 2018 मध्ये करण्यात आलेल्या पंचनाम्यात या पुरातन 71 नाण्यांसह प्राचीन सोन्या-चांदीच्या वस्तू आणि मौल्यवान अलंकार दप्तरी नोंद नसल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, किशोर गंगणे आणि अॅड. शिरीष कुलकर्णी यांनी माहितीच्या अधिकारात तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या साठा नोंद दप्तराची मागणी केली होती. त्यात 71 पुरातन नाणी गायब झाल्याचे उघड झाले आहे. नेमके हे नाणी कशी गायब झाली याची चौकशी करा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासन या प्रकरणी काय कारवाई करते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.