जीटीबी स्थानकाचे स्थलांतर

हार्बरवरील गुरू तेग बहादूर नगर स्थानक १०० मीटर पुढे सरकवणार; मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालवाहतुकीसाठी तिसऱ्या मार्गाचे काम
हार्बरवरील जीटीबी (गुरू तेग बहादूर नगर) नगर स्थानक स्थलांतरीत करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. कुर्ला ते वडाळापर्यंत मुंबई पोर्ट ट्रस्टच्या (बीपीटी) मालवाहतुकीच्या तिसऱ्या मार्गिकेच्या कामासाठी सध्याचे जीटीबी नगर स्थानक पनवेलच्या दिशेने आणखी १०० मीटर पुढे हलवण्यात येईल, अशी माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे या स्थानकात नव्याने सुविधा उपलब्ध करताना त्यात आणखी वाढ होणार आहे. एखादे जुने स्थानक स्थलांतरित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मालवाहतुकीसाठी वडाळा ते कुर्लापर्यंत ४.४ किलोमीटर लांबीची मार्गिका उपलब्ध केली जाणार आहे. तिसरी स्वतंत्र मार्गिका बांधण्यासाठी बीपीटीकडूनच रेल्वेला निधी उपलब्ध करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च १७६ कोटी रुपये आहे. यात नव्याने जीटीबी स्थानक उभारणे, नवीन मार्गिका व सोयिसुविधा इत्यादी कामे आहेत. प्रकल्पातील प्राथमिक कामांना सुरुवात झाली असून काम पूर्ण होण्यासाठी दोन वर्षे लागतील.
प्रकल्पानुसार संपूर्ण जीटीबी नगर स्थानक पनवेलच्या दिशेने १०० मीटर पुढे हलवण्यात येईल. या स्थानकाजवळ एक उड्डाणपूल आहे. येथे मालवाहतुकीसाठी तिसरी मार्गिका उभारणीसाठी जागा नाही. मार्गिका उपलब्ध होण्यासाठीच जीटीबी स्थानक स्थलांतरित केले जाईल. यासाठी सध्याचे फलाट तोडून नव्याने रेल्वे रूळ उभारतानाच दोन नवीन फलाटदेखील बांधण्यात येतील. आताच्या जीटीबी नगर स्थानकातील सुविधांच्या तुलनेत नव्याने उभारण्यात येणाऱ्या स्थानकात पादचारी पूल, सरकते जिने, तिकीट खिडक्या इत्यादी सुविधांमध्येही वाढही होणार आहे.
अतिक्रमणांचा अडथळा
नवीन मार्गिका व स्थानक उभारताना अतिक्रमणांचा अडथळा आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सध्या प्राथमिक स्तरावर असलेल्या कामांची व्याप्ती नंतर वाढेल. त्यामुळे मोठे ब्लॉकही घेण्यात येणार आहेत.