breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

सामाईक प्रवेश परीक्षा आजपासून

मुंबई : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी तंत्रज्ञान व दुग्ध व्यवसाय या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणारी परीक्षा (एमएच-सीईटी) गुरुवारपासून (२ मे) सुरू होत असून यंदा पहिल्यांदाच ही परीक्षा ऑनलाइन होणार आहे. ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी सुसज्ज अशी पुरेशी परीक्षा केंद्रे उपलब्ध न झाल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा केंद्रांची संख्या घटली आहे.

राज्याच्या प्रवेश नियमन कक्षाकडून घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा २ ते १३ मे या कालावधीत होणार आहे. या परीक्षेसाठी यंदा ४ लाख १३ हजार २८४ विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे. आतापर्यंत ही परीक्षा लेखी घेण्यात येत होती.  यंदापासून ती ऑनलाइन होत आहे. ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी सुसज्ज परीक्षा केंद्र उपलब्ध न झाल्यामुळे परीक्षा केंद्रांची संख्या १ हजार २६० वरून यंदा १६६ झाली आहे.

परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करून त्याची ए४ आकाराच्या कागदावर छापील प्रत घ्यावी. प्रवेशपत्रावरील काही माहितीत चुका असल्यास किंवा बदल करायचा असल्यास विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर हमीपत्र द्यावे. प्रवेशपत्राबरोबरच पॅनकार्ड, पारपत्र, वाहन चालवण्याचा परवाना, बँकेचे पासबुक, आधार कार्ड, शाळा, महाविद्यालयाचे २०१८-१९ या वर्षांतील ओळखपत्र यांपैकी एखादा छायाचित्र असलेला ओळखीचा पुरावा बरोबर असणे आवश्यक आहे, अशा सूचना राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे आयुक्त आनंद रायते यांनी दिल्या आहेत.

नीटसाठी पेन-पेन्सिलही नको

राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी (नीट) परीक्षा केंद्रात पेन, पेन्सिलसह लेखनाचे साहित्य, वह्य़ा, पुस्तके, पाण्याची बाटली, मोबाइल, गॉगल, पैशाचे पाकीट, पिशव्या, दप्तर आदी नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. नीट रविवारी (५ मे) होणार आहे. यंदा ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) घेण्यात येत असून गेल्या दोन वर्षांप्रमाणेच यंदाही विद्यार्थ्यांना पोशाख कसा असावा, काय बरोबर न्यावे याबाबत कठोर नियम करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी सौम्य रंगाचे कपडे घालावेत. लांब बाह्य़ांचे कपडे घालू नयेत. बूट न वापरता, चप्पल किंवा सँडल्स घालावेत. घडय़ाळ, दागिने घालू नयेत अशा सूचना एनटीएने दिल्या आहेत. धार्मिक आधार असलेले किंवा पारंपरिक पोशाख घालून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी २ तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. परीक्षेला दीड वाजल्यानंतर कुणालाही प्रवेश देण्यात येणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button