breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
जिल्ह्यातील बैलगाडा मालकांची आमदार लांडगे यांच्याहस्ते ‘नवसपूर्ती’

– निमगाव खंडोबाच्या नंदीला चांदीचे आवरण
– आमदार लांडगे यांच्याहस्ते धार्मिक कार्यक्रम
श्री क्षेत्र निमगाव – बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवण्यात यावी, असे साकडे पुणे जिल्ह्यातील बैलगाडा मालकांनी श्री क्षेत्र निमगाव येथील खंडेरायाला घातले होते. शर्यतींचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आमदार महेश लांडगे आणि गाडा मालकांनी रविवारी नवसपूर्ती केली.
यावेळी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नवनाथ होले, माजी आमदार दिलीप मोहीते, दिगंबर भेगडे, अण्णासाहेब भेगडे, बाळासाहेब कड, नारायणगाव येथील विलास भुजबळ, उद्योजक गोविंद खिलारी, आबासाहेब शेवाळे, संदीप बोदगे, बाळासाहेब आरुडे,
पुणे व नगर जिल्ह्यातील बैलगाडा मालक आणि शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री क्षेत्र निमगाव खंडोबा (ता. खेड, जिल्हा पुणे) येथे सुमारे ४०० वर्षांपासून बैलगाडा पळवण्याची परंपरा आहे. या ठिकाणाहून बैलगाडा शर्यतींची सुरूवात झाली, अशी अख्यायिका सांगीतली जाते. राज्यातील बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आल्यानंतर जानेवारी २०१७ मध्ये राज्यातील प्रमुख बैलगाडा मालकांची निमगाव येथे महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. त्यावेळी बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू होण्याबाबत सरकारने कायदा करावा, असे साकडे श्री खंडोबाला घालण्यात आले होते. आता तत्कालीन (दि.२३ जुलै) राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी राज्य सरकारने पाठविलेल्या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे पंचक्रोशितील बैलगाडा मालकांनी श्री खंडोबाला केलेला नवस पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार खंडोबाच्या नंदीला चांदीचे आवरण अर्पण करण्यात आले, अशी माहिती अखिल भारतीय बैलगाडा मालक संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण टाकळीकर यांनी दिली.
—————
पहिली शर्यत निमगावलाच होवू द्या…
राज्यात शंकरपट सुरू होणार म्हटल्यावर बैलगाडा मालक आणि शौकिनांनी श्री क्षेत्र निमगाव येथे श्री खंडेरायाला केलेले नवस पूर्ण केले. तब्बल १४ किलो वजनाच्या चांदीची झालर नंदीवर चढवण्यात आली. बैलगाडा शर्यतींची सुरूवात याच ठिकाणी झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याचा निर्णय झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने पहिली शर्यत निमगावमध्ये व्हावी, अशी मागणी यावेळी बैलगाडा मालक आणि शौकिनांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे केली आहे.