breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

जनतेकडे जाण्याची हिंमत नसल्याने भाजपचे “सेलिब्रेटीं’शी संपर्क अभियान!

  • विखे-पाटलांनी भाजपाच्या अभियानाची उडवली खिल्ली

  • शिवसेनेने अमित शहांना झणझणीत वडापावचा ठसका का दिला नाही?

मुंबई – केंद्र व राज्य सरकारच्या मागील चार वर्षांच्या कारभारावर जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. भाजपलाही त्याची पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे थेट जनतेशी संपर्क साधून त्यांचे समर्थन मागण्याची हिंमत भाजपकडे राहिलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर “सेलिब्रेटीं’कडे जाऊन “संपर्क फॉर समर्थन’ अभियान राबवण्याची वेळ ओढवली, अशी खिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उडवली.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसंदर्भात प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना विख-पाटील यांनी दोन्ही पक्षांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, भाजपने समर्थन मागण्यासाठी सेलिब्रिटींऐवजी सर्वसामान्य जनतेकडे जायला हवे होते. गेल्या 1 जूनपासून संपूर्ण देशात शेतकऱ्यांचा संप सुरू आहे. भाजपला समर्थन मागायचेच होते तर संपर्क शेतकऱ्यांकडे जाऊन समर्थन मागायला हवे होते. पेट्रोल-डिझेलच्या महागाईने होरपळून निघालेल्या ग्राहकांकडे जाऊन समर्थन मागायला हवे होते.

एसटीच्या 18 टक्के भाडेवाढीचा फटका बसलेल्या सर्वसामान्य प्रवाशांकडे जाऊन समर्थन मागायला हवे होते. नोकरीसाठी दाहीदिशा फिरणाऱ्या तरूणांकडे जाऊन समर्थन मागायला हवे होते. नोटाबंदी, जीएसटीने व्यवसाय ठप्प झालेल्या व्यापारी अन्‌ उद्योजकांकडे जाऊन समर्थन मागायला हवे होते. पण भाजपकडे तेवढी हिंमत राहिलेली नसून, विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना भेटून अन्‌ त्यांचे समर्थन मागून देशातील जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.

भाजपने मागील चार वर्ष देशाची सतत दिशाभूलच केली आहे. शिवसेनेनेही त्यावर वारंवार अत्यंत कठोर भाषेत टीका केली. भाजपने केलेल्या देशाच्या फसवणुकीसाठी शिवसेनेने अमित शहा यांना झणझणीत वडापावचा ठसका द्यायला हवा होता. पण त्याऐवजी त्यांनी ढोकळा, खांडवी अन्‌ गाठिया हाती घेऊन भाजप नेत्यांचे स्वागत केले. हा महाराष्ट्राचा मोठा अवमान असून, तो शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी व्हावा, हे सर्वात मोठे दुर्दैव आहे. या अवमानानंतर शिवसेनेला भाजपवर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाही, असेही विखे पाटील म्हणाले.

निरूपम ऐवजी उद्धव ठाकरेंना नजरकैदेत ठेवायला हवे 
मागील चार वर्ष विरोधी पक्षांनी संपूर्ण देशात भाजप व शिवसेना सरकारविरूद्ध रान पेटवले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना धडकी भरली असून, चार वर्ष एकमेकांवर प्रचंड टीका केल्यानंतर एकत्र येण्यासाठी केविलवाणी धडपड करतात, हा विरोधी पक्षांचा मोठा विजय आहे. सरकारच्या मनात विरोधी पक्षांबद्दल धास्ती असल्यामुळेच अमित शहांच्या दौऱ्यात कॉंग्रेसने आंदोलन करू नये म्हणून मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांना सकाळपासून नजरकैदेत ठेवण्यात आले. पण खरे तर भाजपला पाठीमागून वार करण्याचा खरा धोका शिवसेनेकडून असल्याने सरकारने निरूपमांना नव्हे तर उद्धव ठाकरेंना नजरकैद करायला हवे होते, असा उपरोधिक टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button