कोल्हापूरात एका ट्रॅव्हल्समधून १९ लाख ५० हजाराची रोकड जप्त

कोल्हापूर – निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. गगनबावडा येथे बुधवारी रात्री उशिरा गगनबावडा पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमध्ये गोव्याहून मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या एका खासगी लक्झरी मधून 19 लाख 50 हजाराची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. निवडणूक काळात गैरमार्गाने आर्थिक उलाढाली होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या मार्गावर रात्रंदिवस नाका-बंदी लागू केले आहे.
आचार संहिता लागू झाल्यापासून आत्तापर्यंत 35 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. त्यात आणखी 19 लाख पन्नास हजार रूपयांची भर पडली आहे. जिल्ह्यात ही तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात येत आहे असे पोलिस अधीक्षकांनी सांगितले. ताब्यात घेतलेल्या परप्रांतीय तरुणाची चौकशी सुरू आहे. त्याच्याकडून रकमेची तपशीलवार माहिती घेण्यात येत आहे. ही रक्कम कोणाकडून आणि कोणासाठी कोणत्या कारणासाठी नेण्यात येत होती याचा अद्याप उलगडा झालेला नाही.