breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

ओला, उबर आंदोलक आक्रमक

संपावर तोडगा नाहीच; सोमवारी मंत्रालयावर मोर्चा

ओला, उबर चालकांचा संप अकराव्या दिवशीही सुरूच असून प्रवाशांचे हाल कायमच आहेत. यामध्ये उत्पन्नही बुडाल्याने चालकही हवालदिल झाले आहेत. गुरुवारी ओला, उबर व्यवस्थापनाशी त्यांच्या कार्यालयात संघटनांची बैठक होणार होती. परंतु कंपन्यांचे प्रतिनिधी फिरकले नसल्याने चर्चा होऊ शकली नाही व संप सुरूच राहिला. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ओला, उबर चालकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असून तोडगा निघाला नाही, तर मातोश्रीवर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याआधी सोमवारी मंत्रालयावर चालकांचा मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे.

गुरुवारी ओला, उबर चालक-मालकांची जाहीर सभा अंधेरी चकाला येथील ओला कार्यालयासमोर पार पडली. दोन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापनासोबत बैठक होणार होती. मात्र ती न झाल्याने संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व मराठी कामगार सेनेने यां संपाला पाठिंबा दिला असून राष्ट्रीय कामगार संघाने ओला, उबर व्यवस्थापनाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. संपात सरकारने दोन दिवसांत तोडगा काढला नाही, तर ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता ओला, उबरचे चालक-मालक मंत्रालयावर धडक मोर्चा काढतील. मोर्चा लालबाग येथून काढण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे सचिव सुनील बोरकर यांनी सांगितले. मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी परिवहन मंत्र्यांनी यातून मार्ग काढला नाही तर उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरही मोर्चा काढला जाईल, असा इशारा दिला.

चालकांची मंत्रालयावर धडक

गुरुवारी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे दहा ओला, उबर चालक जमले आणि त्यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट मागितली. सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी करत या ठिकाणी सुमारे दहा मिनिटे गाडय़ा पार्क करून आंदोलनही केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button