एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन करारात दुप्पट वाढ- दिवाकर रावते

मुंबई : एसटी महामंडळाच्या 70 व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी कर्मचाऱ्यांवर घोषणांचा अक्षरशः पाऊस पाडला. शिवाय वेतन करारात दुपटीने वाढ करत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन करार अनेक कारणांनी रखडला असल्याचे सांगत, आतापर्यंत झालेल्या सर्व वेतन करारांपैकी दुप्पट वाढ देणार असल्याचे रावते म्हणाले.
शिवशाहीचे सरकार असताना 1996 ला 72 कोटींचा करार केला. सगळ्याच सरकारच्या कार्यकाळात दोन वर्षांपर्यंत करार रखडले. तरीही याच सरकारवर टीका करण्यात आली. पाप कुणाचे अन् ताप कुणाला अशी माझी अवस्था झाली असल्याचेही रावते म्हणाले. 2012 ते 2016 या काळात 1240 कोटींचा करार होता. 2016 ते 2020 सालापर्यंत 4849 कोटींचा करार करण्याचा निर्णय घेत असल्याचे रावतेंनी जाहीर केले. सातव्या वेतन आयोगाचे सूत्र वापरून 2.57 नुसार वेतनवाढ केली आहे. या वेतनवाढ कराराचा 47 हजार ते 50 हजार कर्मचाऱ्यांना फायदा होईल. यासाठी 176 कोटी रुपयांचा भार महामंडळ स्वीकारत आहे, अशी माहिती रावतेंनी दिली.