उत्तरप्रदेशात पुन्हा धुळीचे वादळ

17 DEAD
लखनौ – उत्तरप्रदेशच्या अनेक भागात काल रात्री झालेल्या धुळीच्या वादळाने अनेक ठिकाणी मोठी पडझड झाली असून त्यात किमान 17 जण ठार झाले. तर अन्य 11 जण जखमी झाले आहेत. सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की अनेक ठिकाणी झाडे पडणे आणि घरे पडण्याच्या दुर्घटना घडल्या त्यात हे बळी गेले आहेत. यात सर्वाधिक फटका मोरादाबाद जिल्ह्याला बसला आहे. तेथे एकूण सात जण मरण पावल्याच्या बातम्या आल्या आहेत.
संबळ जिल्ह्यात तीन जण मरण पावले तर बदायु, मुज्जफरनगर, आणि मेरठ जिल्ह्यात प्रत्येकी दोन जण यात दगावले. सर्व आपदग्रस्तांना येत्या 24 तासांच्या आत मदत सामग्री पोहचवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. गेल्याच महिन्यात उत्तरप्रदेशात झालेल्या वादळ व पावसाने एकूण 130 जण दगावले होते तसेच नुकतेच बरेली, बाराबंकी, बुलंदशहर आणि लखमीपुर खेरी या जिल्ह्यातील वादळी वाऱ्यात एकूण 39 जण दगावले होते.