आयपीएलवर सट्टा खेळण्यास आडकाठी, पतीकडून पत्नीची हत्या

आयपीएलवर सट्टा खेळण्यास मनाई करणाऱ्या महिलेची तिच्या नवऱ्याने आणि सासरच्या मंडळींनी हत्या केल्याचा धक्कादाय प्रकार घडलाय. पश्चिम बंगालमधील मालदा शहरात हा प्रसंग घडला आहे. अर्पिता दासगुप्ता असं या पीडित महिलेचं नाव आहे. घटनेनंतर शेजारच्यांनी अर्पिताला तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलवलं. मात्र रुग्णालयात पोहचेपर्यंत अर्पिताने आपले प्राण गमावले होते.
सहा वर्षांपूर्वी अर्पिताचं सुवेंदू दासगुप्ताशी लग्न झालं होतं. अर्पिताचे वडील संतोष दत्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्पिताचा पती सुवेंदूला आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावण्याची सवय लागली होती. याचसोबत तो ड्रग्जच्या आहारीही गेला होता. या वर्षी त्याने सट्टा लावण्यासाठी दोन लाखांपेक्षा जास्त रकमेचं कर्ज काढलं होतं. आतापर्यंतचं झालेलं कर्ज फेडण्यातही त्याला अपयश आलं होतं. याचसोबत कर्जाचा डोंगर झाल्यामुळे सुवेंदू दिवसभर घरात राहणं टाळायचा, रात्री अंधार झाल्यानंतर तो घरी परत यायचा.
पती आणि सासरच्यांकडून मारहाण झाल्यानंतर, अर्पिताच्या मुलीने फोन करुन संतोष दत्ता यांना घडलेल्या प्रसंगाविषयी माहिती दिली. मात्र घरी पोहचेपर्यंत अर्पिताला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात पोहचेपर्यंत अर्पिताने आपले प्राण सोडले होते. बुधवारी रात्री हा प्रकार घडल्याचं समजतंय. सुवेंदू आणि त्याच्या घरच्यांनी आपल्या मुलीला अॅसिड प्यायला लावल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप, अर्पिताचे वडिल संतोष दत्ता यांनी केला आहे.
दरम्यान घडलेल्या प्रकाराबद्दल संतोष दत्ता यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. मात्र सुवेंदू आणि त्याच्या घरचे हे फरार असून त्यांना पकडण्यासाठी पथकांची स्थापना केली असल्याची माहिती इंग्लिशबाझार पोलिस स्थानकाचे प्रमुख शंतनू मित्रा यांनी दिली.