अर्जुन रामपाल आणि मेहर जेसियाचे वैवाहिक संबंध संपुष्टात

अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहर जेसिया यांनी लग्नानंतर 20 वर्षांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. बऱ्याच काळापासून या दोघांमध्ये तणाव होता. आता दोघांनी आपापला स्वतंत्र रस्ता निवडायची वेळ आली आहे, असे या दोघांनी एका स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.
आपल्या वैवाहिक आयुष्याचा प्रवास खूपच सुंदर होता. या 20 वर्षांच्या आठवणी कायमच आपल्या मनामध्ये कायम राहतील. पण प्रत्येक प्रवासाचा एक अंत असतो. त्यानुसार या सुंदर नात्याचाही शेवट करण्याची वेळ आली आहे, असे या दोघांनी म्हटले आहे.
दोघेही यापुढेही एकमेकांचे चांगले मित्र म्हणून कायम राहणार आहेत आणि एकमेकांच्या अडचणीच्यावेळी मदतीलाही येणार आहेत, असेही या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे. दोघेही खूपच पर्सनल वृत्तीचे आहेत आणि स्वतःच्या खासगी आयुष्याबाबत उघडपणे बोलणे टाळत आलेले आहेत. त्यामुळेच विभक्त होण्याच्या निर्णयाचे मिडीयाला स्टेटमेंट देणे दोघांसाठीही खूप अवघड होते.
हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुसैन खान यांचा घटस्फोट झाला, तेंव्हापासूनच अर्जुन आणि मेहरमध्ये तणावाला सुरुवात झाली होती. जेंव्हापासून त्यांच्यात तणाव निर्माण झाला आहे, तेंव्हापासूनच ते स्वतंत्र रहात होते. अर्जुन रामपाल आणि मेहर जेसिया यांनी 1998 साली विवाह केला होता.