अभिनेता राजपाल यादव काँग्रेसकडून मनोज तिवारींविरोधात लढणार?

बॉलिवूडचा विनोदी अभिनेता राजपाल यादव लवकरच काँग्रेसमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा आहे. कारण, राजपाल यांनी दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षा शीला दीक्षित यांची भेट घेतली असून काँग्रेसच्या तिकीटावर त्यांना दिल्लीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली भाजपाचे अध्यक्ष भोजपुरी अभिनेते मनोज तिवारी यांच्याविरोधात त्यांना संधी मिळू शकते. असे झाले तर या दोन्ही अभिनेत्यांमध्ये कोण वरचढ ठरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. रिपब्लिक न्यूज पोर्टलने यांसदर्भात वृत्त दिले आहे.
Actor Rajpal Yadav arrives at Delhi Congress Chief Sheila Dikshit’s residence in Delhi. pic.twitter.com/WvJt3RDkRu
— ANI (@ANI) April 4, 2019
राजपाल यादव यांनी बुधवारी शीला दीक्षित यांची भेट घेतली होती, त्यानंतर दुसऱ्या दिवशी आज ते पुन्हा दीक्षित यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. कदाचित आजच्या चर्चेमध्ये त्यांच्या काँग्रेसप्रवेशाबाबत आणि उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा होऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून राजपाल हे काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी घेत होते. मात्र, या केवळ वैयक्तिक कारणांसाठीच्या भेटी असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात होते. मात्र, रिपब्लिकने त्यांच्या सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, राजपाल यादव यांना काँग्रेसच्या तिकीटावर भाजपाचे दिल्ली अध्यक्ष मनोज तिवारी यांच्याविरोधात तिकीट दिले जाऊ शकते.
२०१४ मध्ये जय प्रकाश अगरवाल हे उत्तर पूर्व दिल्ली मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते. त्यावेळी मनोज तिवारी यांनी त्यांचा मोठा पराभव केला होता. त्यांना सुमारे सहा लाख मते मिळाली होती. तर अगरवाल २.१४ लाख मते मिळवत तिसऱ्या स्थानावर होते. दुसऱ्या स्थानी राहिलेले आपचे उमेदवार प्रा. आनंद कुमार यांना ४.५ लाख मतं मिळाली होती. गेल्या निवडणुकीत दिल्लीतील सर्व ७ जागा भाजपाने जिंकल्या होत्या.
सध्या काँग्रेस आणि आपमध्ये दिल्लीत आघाडीबाबत खलबत सुरु आहेत. त्यामुळे या जागेसाठी दोन्ही पक्षांकडून अधिकृतरित्या घोषणा होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला आप काँग्रेससोबत आघाडीसाठी तयार होती. मात्र, शीला दीक्षित आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी काही मुद्द्यांवरुन या आघाडीच्या विरोधात होते. मात्र, आता पुन्हा आप आणि काँग्रेसमध्ये आघाडी होण्याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
कर्ज थकवल्याप्रकरणी तुरुंगवास भोगावा लागलेला अभिनेता राजपाल यादव यांची फेब्रुवारीत तुरुंगातून सुटका झाली आहे. त्यानंतर आपण बाहेर आल्याने आनंदी असून पुन्हा बॉलिवूडमध्ये काम करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले होते.