breaking-newsराष्ट्रिय

१५ वर्षात अमेठीत जे राहुल गांधींना जमले नाही ते स्मृती इराणी करुन दाखवणार

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी अमेठी मतदारसंघातून मोठ्या फरकाने लोकसभा निवडणूक जिंकली. निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी आपल्या मतदारसंघाला भेट दिली. त्यांनी या भेटीदरम्यान दिलेल्या एका आश्वासनाची सध्या अमेठीमध्ये बरीच चर्चा आहे. मतदारसंघातील लोकांसाठी कायम उपलब्ध राहता यावे या उद्देशाने मी अमेठीमध्ये घर बांधणार असल्याचे इराणी यांनी एका कार्यक्रमात जाहीर केले. मागील १५ वर्षांपासून अमेठीचे खासदार असणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या मतदारसंघात आपल्या कार्यकाळात घर बांधले नाही हे विशेष. राहुल गांधी खासदार असताना जेव्हा जेव्हा अमेठीला भेट द्यायचे तेव्हा ते शासकीय अतिगृहामध्येच रहायचे.

स्मृती इराणी यांनी शनिवारी झालेल्या एका जाहीर कार्यक्रमामध्ये भाषण देताना, ‘आता यापुढे आपण अमेठीमध्ये पाहुणी म्हणून येणार नाही’ असे सांगितले. ‘मी गौरीगंज परिसरामध्ये एक जमीनीचा तुकडा पाहिला असून लवकरच अमेठीमध्ये माझे कायम स्वरुपी घर असणार आहे. हे घर सर्वांसाठी कायमच खुले असणार आहे. आता मी येथील पाहुणी राहणार नाही’, असं इराणी यांनी भाषणादरम्यान सांगितले. यावेळी मंचावर उत्तर प्रदेशचे उप-मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री केशव प्रसाद मौर्याही उपस्थित होते.

गांधी कुटुंबाकडे २० वर्षे होती खासदारकी तरी…

राहुल गांधी पहिल्यांदा २००४ साली अमेठीमधून निवडणूक लढले आणि जिंकले. त्यानंतर सलग तीन वेळा त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवत लोकसभेत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्याआधी १९९९ साली सोनिया गांधी यांनी विजय मिळवला होता. इतके वर्षे या मतदारसंघातून निवडूण येऊनही गांधी कुटुंबाने अमेठीमध्ये एकही घर बांधले नाही. दर वेळी अमेठी दौऱ्यावर येणारे गांधी कुटुंबातील सदस्य सरकारी अतिथीगृहात मुक्काम करायचे.

राहुल गांधींवर साधला निशाणा

आपल्या दोन दिवसीय दौऱ्यामध्ये इराणी यांनी पहिल्या दिवशी झालेल्या सभेमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीवर टिका केली. ‘नामदार लोक येथून खासदार म्हणून निवडूण आल्यानंतर पाच वर्षे बेपत्ता होते. अमेठीमधील जनतेने दिवा घेऊन इथून दिल्लीपर्यंत त्यांचा शोध घेतला पण ते नाही सापडले’, असा टोला इराणी यांनी राहुल यांचे नाव न घेता लगावला. अमेठीच्या जनतेने मतपेटीतून दिलेले आवाज संपूर्ण जगाने ऐकला. नामदारांना निरोप देत अमेठीच्या जनतेने विकासाच्या पारड्यात मत टाकले. एका सामन्य घरातील सदस्याला अमेठीच्या जनतेने निवडले आहे. मी पूर्ण इमानदारीने जनतेची सेवा करेन, असं इराणी म्हणाल्या.

काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अमेठीमध्ये इराणी यांनी राहुल गांधीचा ५० हजारहून अधिक मतांनी पराभव केला. ‘ज्या लोकांनी मला मत दिले नाही त्यांना सरकारी योजनांपासून वंचित ठेवले जाणार नाही. अमेठीमधील चार लाख काँग्रेस मतदारांशी कोणताही भेदभाव केला जाणार नाही’ असे आश्वासनही इराणी यांनी दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button