breaking-newsमहाराष्ट्र

संपूर्ण भारतात सरासरीच्या दहा टक्के कमी पाऊस

नागपूर : भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज जवळजवळ चुकीचा ठरला असून संपूर्ण भारतात एक जून ते नऊ ऑगस्ट या कालावधीत सरासरीच्या दहा टक्के कमी पाऊस झाला आहे. भारतासाठी ही स्थिती धोकादायक असून महाराष्ट्राला देखील कमी पावसाचा मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यंमध्ये अतिशय कमी पाऊस पडला आहे.

जून ते सप्टेंबर या महिन्यात ९७ टक्के पाऊस पडेल, असे भाकीत भारतीय हवामान खात्याने पावसाळ्याच्या सुरुवातीला वर्तविले होते, तर स्कायमॅट या खासगी संस्थेनेही मोठा पाऊस पडेल, असा अंदाज दिला होता. त्यानंतर त्यांनी हे प्रमाण कमी केले. प्रत्यक्षात आता हा अंदाज देखील खोटा ठरत आहे. जूनमध्ये खूप पाऊस आला आणि १५ जुलैपासून पावसात जो खंड पडला तो अजूनही कायम आहे. मराठवाडय़ातील स्थिती अतिशय बिकट असून औरंगाबादमध्ये सरासरीपेक्षा ४० टक्के कमी पाऊस पडला आहे. विदर्भातही स्थिती चांगली नाही.  विदर्भात पावसाचा खंड १५ दिवसांचा तर खान्देश आणि मराठवाडय़ात तो एक महिन्याचा आहे. पूर्व भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने या आठवडय़ात राज्यातील काही भागात पाऊस पडणार नाही, असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. यामुळे राज्यातील बऱ्याच भागात उष्णता कायम राहील. शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

राज्यातील ३० तालुक्यात २५ ते ५० टक्केच पाऊस

एक जूनपासून आता ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ाची स्थिती पाहता राज्यातील किमान ३० तालुके असे आहेत, ज्याठिकाणी सरासरीच्या २५ ते ५० टक्केच पाऊस पडला आहे. ११४ तालुके असे आहेत, ज्याठिकाणी सरासरी ५० ते ७५ टक्के पाऊस झालेला आहे. ११५ तालुक्यात ७५ ते १०० टक्के पाऊस आणि ९४ तालुक्यात १०० टक्के व त्याहून अधिक पाऊस झाला आहे.

१६ ऑगस्टपर्यंत दिलासा नाहीच

१६ ऑगस्टपर्यंत पूर्व विदर्भात भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यतील काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, वाशीम, बुलढाणा, उत्तर मराठवाडय़ातील औरंगाबाद, जालना, परभणी आणि जळगावमध्ये केवळ हलक्या पावसांच्या सरींची थोडी शक्यता राहील. उर्वरित मराठवाडा, खान्देश आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात सांगली, सोलापूर जिल्ह्यत किमान १६ ऑगस्टपर्यंत तरी चांगला पाऊस अपेक्षित नाही. दरम्यान, कोकणात हलका पाऊस सुरू राहील, पण बहुतांश मध्य महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये चांगल्या पावसाची शक्यता कमी  असल्याचा अंदाज देखील हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

सलग १५ दिवस पाऊस हवा

मराठवाडा, बुलढाणा, खान्देशात पावसाची आणि परिणामी पिकांची स्थितीही चांगली नाही. त्यामुळे चांगला पाऊस पडेल, या खोटय़ा अपेक्षेत राहणे आणि खर्च करणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. नागपूर किंवा एका जिल्ह्यत कमी पाऊस पडला तर फरक पडत नाही, पण संपूर्ण भारतात सरासरीच्या दहा टक्के कमी पाऊस असेल तर खूप मोठा फरक पडतो. सहजासहजी हा फरक भरून निघणे शक्य नाही. सलग १५ ते २० दिवस मोसमी पाऊस मोठय़ा प्रमाणात पडला तरच हा फरक भरून काढता येतो.

– अक्षय देवरस, हवामान तज्ज्ञ

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button