breaking-newsक्रिडा

वाढत्या वयाबरोबर बहरतोय रोनाल्डोचा खेळ – सान्तोस

मॉस्को – ख्रिस्तियानो रोनाल्डोने पोर्तुगालच्या मोरोक्‍कोवरील विजयात निर्णायक भूमिका बजावून रशियातल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत आपली गोलसंख्या चारवर नेली. तत्पूर्वी त्याने स्पेनविरुद्धच्या सामन्यात गोलची हॅटट्रिक साजरी केली होती. या चार गोलसह रोनाल्डोने विश्‍वचषक स्पर्धेत आपला ठसा उमटवला आहे. रोनाल्डोचा खेळ जुन्या “पोर्ट वाईन’प्रमाणे वयाबरोबर आणखीनन बहरत असल्याचे प्रशंसोद्‌गार पोर्तुगालचे मुख्य प्रशिक्षक फर्नांडो सान्तोस यांनी काढले आहेत.

रोनाल्डोला यार्पुूीच्या तीन विश्‍वचषक स्पर्धांमध्ये फक्त तीनच गोल करण्यात यश मिळाले होते. मात्र यंदाच्या विश्‍वचषक स्पर्धेत त्याने दोन सामन्यांमध्ये चार गोल करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. सान्तोस म्हणाले की, रोनाल्डो सध्या भूतकाळाचा विचार करत नाही किंवा त्याला आलेल्या आधीच्या अपयशाबद्दल तो विचार करत नाही. त्यामुळेच त्याचा खेळ एखाद्या जुन्या वाईनप्रमाणे बहरत आहे. विश्‍वचषकासाठीच्या पात्रता फेरीत 15 गोल करून संघाला लागोपाठ 9 विजय मिळवून देत रोनाल्डोने याचा प्रत्यय दिला आहे.

रोनाल्डोच्या नावावर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये आता 85 गोल झाले आहेत. आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या मैदानात सर्वाधिक गोल डागणारा तो युरोपियन फुटबॉलवीर ठरला आहे. याआधी हा विक्रम हंगेरीच्या फेरेन्क पुशकसच्या नावावर होता. त्यानं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये 84 गोल केले होते. दरम्यान, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक 109 गोलचा विक्रम इराणच्या अली डोईच्या नावावर आहे.

रोनाल्डोने 151 आंतरराष्ट्रीय सामन्यात 85 गोल केले आहेत. तसेच तो चार वेळा तो युरोपियन “गोल्डन शू’चा मानकरी ठरला आहे. शुक्रवारी स्पेनविरुद्धच्या अंतिम सामन्याचे स्वरूप असलेला थरारक सामना संपण्यास 2 मिनिटे असताना सामना स्पेनने 3-2 असा जिंकल्यासारखाच होता. पण अखेरच्या क्षणात डी बाहेर मिळालेल्या फ्री किकवर रोनाल्डोने गोलजाळ्याचा अचूक वेध घेऊन पोर्तुगालला बरोबरी साधून दिली आणि विश्वचषकातील पहिली हॅटट्रिक नोंदविली.
स्पेनविरुद्धच्या सामन्यात हॅट्ट्रिक नोंदवणाऱ्या रोनाल्डोवर संपूर्ण क्रीडाविश्वातून कौतुकाचा वर्षांव होत आहे. कारकीर्दीतील 51व्या हॅटट्रिकला गवसणी घालणाऱ्या रोनाल्डोला घेरण्यासाठी विरोधी संघांचे बचावपटू अनेक व्यूहरचना रचत असतील. मात्र रोनाल्डोला रोखणे कठीणच नव्हे तर अशक्‍य आहे, याचा प्रत्यय स्पेन आणि मोरोक्‍कोविरुद्धच्या सामन्यात सर्वाना आला.

रोनाल्डोची अद्वितीय क्षमता 
इतक्‍या महत्त्वाच्या लढतीत हॅटट्रिक साधणे ही एकमेवाद्वितीयच कामगिरी होती. विशेष म्हणजे त्याने केलेल्या तिन्ही गोलमध्ये विविधता होती. एक गोल पेनल्टी स्ट्रोकवर, दुसरा मैदानी तर तिसरा फ्री किकच्या साहाय्याने केला. त्याची अत्युच्च धावगती, शारीरिक तंदुरुस्ती, फुटबॉलवरील ताबा, गोलपोस्टमध्ये होणारे वेगवान व दिशादर्शक आक्रमण, सहकाऱ्यास अचूक पास देणे व मिळालेल्या फ्री किकवर अचूक गोलजाळ्याचा भेद घेणे. या बाबी वैशिष्टयपूर्ण आहेत. तो ज्या चाली रचतो, त्यामुळे संघ सहकाऱ्यांना आक्रमक खेळणे सहजशक्‍य होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button