breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

रुग्णालयाने अडवून ठेवलेल्या बाळाची सुटका

ठाण्यातील प्रकार, शुल्क न भरल्याने अडवणूक केल्याचा आरोप

आई-वडिलांना उपचाराचे शुल्क भरणे शक्य नसल्याने रुग्णालयाने सव्वा महिना अडवून ठेवलेल्या चार महिन्यांच्या बाळाची गुरुवारी मनसे कार्यकर्त्यांच्या हस्तक्षेपामुळे सुटका करण्यात आली. दुपारी साडेबाराच्या सुमारास मनसेचे कार्यकर्ते ठाण्याच्या वेदांत रुग्णालयात गेले. त्यांनी चार महिन्यांच्या तान्हुलीला ताब्यात घेऊन तिच्या आईकडे सोपवले. तिला पोटाशी कवटाळून आईने अक्षरश: हंबरडा फोडला. तो प्रसंग पाहून रुग्णालयातील साऱ्यांचेच डोळे पाणावले.

अंजली नायक यांच्या अडीच महिन्यांच्या मुलीला अचानक त्रास होऊ लागला. त्यांनी तिला वाडिया रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी मुलीला ठाणे-वर्तकनगर येथील वेदांत रुग्णालयात १ जानेवारी २०१९ रोजी दाखल केले. वेदांत रुग्णालयात मुलीवर उत्तम उपचार करण्यात आले. मात्र उपचारांचा खर्च जास्त होता. त्यामुळे पैसे कोठून आणायचे, असा प्रश्न अंजली यांच्या पतीला पडला. ते रिक्षा चालवतात. त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्ष, बिईंग ह्य़ूमन, टाटा ट्रस्टसह अनेक संस्थांकडे अर्ज केले- आर्जवे केली. मात्र त्यांना मदत मिळालीच नाही.

उपचाराचे शुल्क भरल्याशिवाय मुलीला रुग्णालयातून सोडले जाणार नव्हते. मग नाईक दाम्पत्याने राजकीय पक्षांच्या कार्यालयात खेटे घातले. परंतु तेथेही त्यांची निराशा झाली. त्यांनी मनसेच्या ठाणे मध्यवर्ती कार्यालयात मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना सर्व हकिकत सांगितली. ‘‘आजपर्यंत ८० हजार रुपये भरले, अजून साडेतीन लाख रुपयांची गरज आहे. ते भरणे शक्य नसल्यामुळे मुलीला रुग्णालयातून सोडत नाहीत. आईला केवळ मुलीला दूध पाजण्यासाठी सोडले जाते..’’

अविनाश जाधव यांनी गुरुवारी काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन वेदांत रुग्णालय गाठले. तेथील डॉक्टरांना बाळाला सोडण्याची विनंती केली. मुख्यमंत्री निधी वा अन्य संस्थांकडून मदत मिळवून रुग्णालयाचे शुल्क भरण्याचा प्रयत्न करू, असे व्यवस्थापनाला सांगितले आणि तान्हुलीला उचलून आईकडे दिले. त्यानंतर त्यांना मालाडला त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी वाहनाची व्यवस्थाही केली.

‘पैशासाठी कोणताही दबाव नाही’

या संदर्भात वेदांत रुग्णालयाचे प्रशासक अजय सिंग यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘वाडिया रुग्णालयातून बाळ आले तेव्हा त्याची प्रकृती गंभीर होती. हृदयविकाराचा त्रास उद्भवल्यानंतर तात्काळ उपचार करण्यात आले. आई-वडिलांनी बाळासाठी कपडे आणि दूधही दिले नाही, ते आम्ही रुग्णालयातून पुरवले. उपचाराचा खर्च तीन लाख ७८ हजार झाला होता. पैशांसाठी आम्ही कोणताही दबाव आणला नाही,  उलट मुख्यमंत्री निधीसह वेगवेगळ्या ठिकाणाहून मदत मिळण्याबाबत मार्गदर्शन केले. मात्र त्यांनी काहीही न करता केवळ रुग्णालयाला बदनाम केले.’’

आजपर्यंत पैशांसाठी आम्ही केव्हाही कोणाचीही अडवणूक केली नाही. नायक दाम्पत्याचा आरोप धादांत खोटा आहे. मनसे कार्यकर्त्यांना वस्तुस्थिती सांगितली. त्यांनी दोन लाख रुपयांपर्यंतची मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आणि ते बाळाला घेऊन गेले.    – अजय सिंग, प्रशासक, वेदांत रुग्णालय

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button