breaking-newsपुणेमहाराष्ट्र

“टेमघर’ची 90 टक्के गळती रोखण्यात यश

जलसंपदा विभागाचा दावा : धरणाचे आयुष्य तीस वर्षांनी वाढले

पुणे- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक असलेल्या टेमघर (ता.मुळशी) धरणाच्या भिंतीमधून होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या दुरुस्तीच्या कामांना यश येत आहे. यंदा धरणात पावसाचे पाणी आल्यामुळे जलसंपदा विभागाने पूर्ण केलेल्या कामाची चाचणी घेतली आहे. यामध्ये 2016 मधील गळती व आताची गळती याचा विचार करता, धरणातील सुमारे 90 टक्के गळती रोखण्यात यश आले असल्याचा दावा जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी केला आहे. धरण दुरुस्तीच्या दुसरा व तिसऱ्या टप्प्यातील कामे पूर्ण झाल्यानंतर धरणातील 100 टक्के गळती बंद होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

टेमघर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी ही माहिती दिली. यावेळी भामा-आसखेड प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सुनील प्रदक्षणे, उपविभागीय अभियंता राजेंद्र कुंजीर, अभियंता सुधीर अत्रे, सहाय्यक अभियंता संदीप शिंदे उपस्थित होते.

टेमघर धरणाचे काम 2010 मध्ये पूर्ण झाले. तेव्हापासून धरणात पाणीसाठा करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र पाणीसाठा सुरू केल्यावर अवघ्या दोन ते तीन वर्षांतच टेमघर धरणातून गळती होत आहे. 2016 साली धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. या पाणी गळतीचे प्रमाण प्रति सेंकद 2 हजार 500 लिटर एवढे होते. त्यामुळे हा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. ही पाणी गळती रोखण्यासाठी जलसंपदा विभागाने सेवानिवृत्त सचिव रानडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती केली होती. या समितीने पाणी गळती रोखण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचविल्या होत्या. त्यानुसार धरणातील पाण्याची गळती रोखण्यासाठी पहिल्या टप्प्यात प्रायमरी आणि सेंकडरी ग्राऊटींगचे काम करण्यात आले. ग्राऊटींगचे काम म्हणजे धरणाच्या भिंतीमध्ये सिमेंट, फ्लाय ऍश आणि सिलिका यांचे मिश्रण एका विशिष्ट दाबाने सोडणे. त्यामुळे धरणाच्या भिंतीमधील पोकळ्या भरुन आल्या असून भिंतीला मजबूती आली असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.

या पहिल्या टप्प्यातील कामानेच गळतीचे प्रमाण 90 टक्के कमी झाले आहे. सध्या प्रति सेंकद 250 लिटर पाणी गळती होत आहे. येत्या काळात ऍशट्रिप ट्रीटमेन्ट, टर्चरी ग्राऊटींग म्हणजेच धरणाच्या भिंतींना सिमेंट भरण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यानतंर ग्लायटिंग म्हणजेच धरणाच्या पाण्याच्या बाजूच्या भिंतीला फायबर आणि विशिष्ट केमिकलचा लेप देण्यात येणार आहे, असे कोल्हे यांनी सांगितले.

असा आहे धरणाचा इतिहास

टेमघर धरणाच्या कामाला 1997 मध्ये सुरूवात झाली होती. 2000 साली या धरणाचे नव्वद टक्के काम पूर्ण झाले होते. फक्त ग्राऊटिंगचे काम करणे शिल्लक होते. मात्र, त्याच वेळी वनविभाग आणि जलसंपदा विभागामध्ये धरणाच्या जागेवरुन वाद होवून हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यानंतर 2010 मध्ये पुन्हा धरणाच्या कामाला परवानगी मिळाली. त्या वेळी ग्राऊटिंगचे काम न करताच धरणामध्ये पाणी साठा करण्यात आला. परिणामी, काही वर्षांतच हे धरण गळू लागले. मात्र, सध्या केलेल्या धरण गळती थांबविण्यासाठी करण्यात आलेले काम अतिशय आधुनिक पद्धतीने करण्यात आले आहे. केंद्रीय जल व उर्जा संशोधन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात आले आहे. या कामामुळे धरणाचे आयुष्य तीस वर्षांनी वाढले आहे, असे कोल्हे यांनी सांगितले.

धरण बांधायला 252 कोटी तर, दुरुस्तीला 100 कोटी खर्च

टेमघर धरण बांधायला एकूण 252 कोटी रुपये एवढा खर्च झाला होता. मात्र, धरणातील पाणी गळती थांबविण्यासाठी 100 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्या पैकी आतापर्यंत 37 कोटी रुपये खर्च झाले आहेत, असे कोल्हे यांनी सांगितले.

32 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

टेमघर धरणाचे काम गुणवत्तापूर्वक झाले नाही, त्यामुळे धरणातून पाणी गळती सुरु झाली आहे, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे धरणाच्या कामावेळी असणाऱ्या 32 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांची चौकशीही सुरू असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button