breaking-newsपुणेमहाराष्ट्र

“झोल-झोल’ रस्त्यांच्या कामात !

  • मुख्यसभेत गदारोळ : खड्डे प्रकरणावरून खडाजंगी
  • कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेची घोषणाबाजी

पुणे – शहरातील रस्त्यांची तात्पुरती केलेली मलमपट्टी सलग तीन-चार दिवस मुसळधार पावसाने उघडी पडली. याचे पडसाद महापालिका आता मुख्यसभेतही पडले आणि त्यामुळे सभेत गदारोळ झाला. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने मुख्यसभेत घोषणाबाजी करत आंदोलन केले.

सोलापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे काही दिवसापूर्वी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा आणि जीविताचा विचार करून हे खड्डे त्वरित बुजवावेत, अशी मागणी नाना भानगिरे यांनी केली.

दरवर्षीच पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात. यावर ठोस पर्याय शोधायला हवा. परदेशात जे तंत्रज्ञान वापरले जाते, ते आपण वापरणे आवश्‍यक आहे, असे अविनाश साळवे म्हणाले.

कोथरूड परिसरात मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे मेट्रोने बुजवावे की महापालिकेने या वादाशी नागरिकांना काही देणे घेणे नाही. हे खड्डे आठवडाभरात बुजवले नाही, तर शिवसेना खड्डे बुजवेल आणि मेट्रोचे काम बंद पाडण्याचा इशारा पृथ्वीराज सुतार यांनी दिला. बिबवेवाडी परिसरातील रस्त्याच्या दूरवस्थेची माहिती बाळा ओसवाल यांनी सभागृहात दिली.

सिमेंटच्या रस्त्यांचा प्रश्‍न नाही परंतु त्याच्या कडेला असलेल्या डांबरी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. एका ठिकाणाहून दुसरीकडे जायला पूर्वी जो वेळ लागत होता, या खड्ड्यांमुळे आता दीडपट जास्त वेळ लागत असल्याचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे म्हणाले. खड्ड्यांचा प्रश्‍न वेळीच संपुष्टात आणला नाही तर “पुणे गेले खड्ड्यात’ असे म्हणावे लागेल, अशी टीकाही तुपे यांनी केली.

प्रशासनाने चांगले तंत्रज्ञान वापरून दर्जेदार काम करावे, असे डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले.

प्रशासन म्हणते, मेट्रोकडून प्रतिसाद नाही

नागरिकांची असुविधा टाळण्यासाठी जानेवारी ते जून दरम्यान कामे हाती घेण्यात आली आहेत. 15 मे रोजी रस्ते खोदाईच्या परवानगी देणे बंद केले आहे. पथ विभागाकडून 12 मीटरच्या पुढील रस्त्याची कामे केली जातात. तर त्यापेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांची कामे संबंधित क्षेत्राकडून केली जातात. मेट्रोच्या कामामुळे पडलेल्या खड्ड्यांबाबत मेट्रोला लेखी आणि तोंडीही सूचना दिल्या आहेत. मात्र त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्याची तक्रार पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी मुख्यसभेत केली. तरीही मेट्रोची वाट न पाहता खड्डे बुजविण्याचे काम पथ विभाग हाती घेणार आहे. समाविष्ट गावांमधील रस्त्यांची अवस्था यापूर्वीच भयानक होती. ती रस्ते दुरुस्ती सुरू केल्याचे पावसकर म्हणाले.

खड्डे विषयावर सत्ताधाऱ्यांपैकी एकही नगरसेवक बोलत नाही. केवळ विरोधी पक्षाच्या प्रभागातच खड्डे आहेत आणि सत्ताधाऱ्यांच्या प्रभागात खड्डे नाहीत, अशी स्थिती आहे का? सत्ताधाऱ्यांच्या प्रभागात खड्डे नसतील आणि तेथे जर खड्डे दुरुस्तीची कामे दाखवली, तर तो पैशांचा अपहार समजायचा का?

– चेतन तुपे, विरोधी पक्षनेते

शहरातील 30 ते 40 टक्के रस्ते सिमेंटचे आहेत. लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून काम कसे दर्जेदार होईल हे पाहिले पाहिजे. सलग दोन तीन दिवस सलग पाऊस पडत असल्याने खड्डे पडले आहेत. अधिकाऱ्यांनी पाहणी करून खड्ड्यांचा त्रास कमी करावा.

– श्रीनाथ भिमाले, सभागृहनेते

ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे संगनमत असल्यानेच संपूर्ण शहरात खड्ड्यांची स्थिती आहे. तसेच आठवडाभरात खड्डे बुजवले नाहीत, तर सत्ताधारी आणि प्रशासनाला त्या खड्ड्यात घालू. पावसाळा हा दर पाच-दहा वर्षांनी येत नाही. दरवर्षीच असतो. त्यामुळे प्रशासनाने योग्य काळजी न घेतल्यास रस्त्यावर खड्डे दिसणार नाहीत. 25 कोटी रुपये खर्चूनही शहरातील रस्त्यांवर खड्डे कसे पडले?

– संजय भोसले, गटनेते, शिवसेना

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button