breaking-newsमहाराष्ट्र

छत्तीसगड स्फोटात थरार; नक्षलींना पळवून लावले

  • जखमी जवान सिद्धेश्वरे यांनी सांगितलेला अनुभव

नांदेड – २७ ऑक्टोबर हा दिवस आमच्या आयुष्यातील थरार अनुभवाचा दिवस होता. नक्षलींच्या रुपात मृत्यू डोळय़ांसमोर दिसत असताना आम्ही भारतमातेच्या रक्षणासाठी जीव गेला तरी बेहत्तर म्हणून नक्षलींशी कडवा मुकाबला केला. हार्दिक आणि मी नक्षलींना पळवून लावण्यात यशस्वी झालो. आमच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच गस्तीवर असलेल्या दुसऱ्या पथकाने आमच्या मोहिमेत सहभागी होऊन खंबीर साथ दिल्याने आमचे मनोबल वाढले. मात्र या मोहिमेत आमच्या सहकाऱ्यांना हौतात्म्य प्राप्त झाल्याचे दु:खही उरात आहे, अशा शब्दांत या बॉम्बहल्ल्यात जखमी झालेले जवान बापूराव सुभाष सिद्धेश्वरे यांनी त्यांचा अनुभव सांगितला.

नक्षल प्रभावित क्षेत्र छत्तीसगडमध्ये सुरक्षेसाठी तनात असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर नक्षलींनी अंदाधुंद गोळीबार करीत स्फोट घडवला. या हल्ल्यात चार जवान शहीद झाले, तर नांदेड जिल्ह्याचा सुपुत्र असलेल्या सीआरपीएफ जवान व अन्य एका सहकाऱ्याने नक्षलींना जशास तसे प्रत्युत्तर देत हल्ला परतवून लावला. मात्र या हल्ल्यात दोघे जवान गंभीर जखमी झाले.

छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात मुरदंडा परिसरात केंद्रीय राखीव पोलीस दलाची तुकडी २७ ऑक्टोबर रोजी तनात होती. हे जवान सायंकाळी साडेचार वाजता आपली मोहीम फत्ते करीत छावणीकडे परतत होते. त्याच वेळी त्यांच्या मागावर असलेल्या नक्षलींनी स्फोट घडवला, तसेच अंदाधुंद गोळीबार करीत बॉम्बहल्लाही केला. या हल्ल्यात चार जवान शहीद झाले, तर नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील सावरगाव (पी) येथील जवान बापूराव सुभाष सिद्धेश्वरे व त्यांचा सहकारी हार्दकि सुरेशकुमार यांनी या कठीण परिस्थितीत नक्षलींच्या हल्ल्यास जशास तसे प्रत्युत्तर दिले आणि शहीद जवानांच्या वाहनातील साहित्य पळवून नेण्याचा नक्षलींचा डाव कसोशीने हाणून पाडला.

या घटनेची माहिती मिळाल्यावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक आर. आर. भटनागर यांनी शहीद जवानांचे नातेवाईक व जखमी सिद्धेश्वरे व हार्दकि सुरेशकुमार यांची तेथील शासकीय रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि विचारपूस करीत या नक्षली हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला. तसेच या शूर जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तराचे कौतुक केले. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या रुग्णालयात उपचार केल्यानंतर बापूराव सिद्धेश्वरे यांना वैद्यकीय रजेवर गावी पाठविण्यात आले. सिद्धेश्वरे यांनी हल्ल्याबाबतचा अनुभव सांगितला. ते  म्हणाले, गावी आल्यानंतर मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड यांनी आपल्या निवासस्थानी येऊन माझ्या प्रकृतीची चौकशी करून वीर जवानांच्या शौर्याबद्दल कौतुक केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button