breaking-newsक्रिडाराष्ट्रिय

आशियाई स्पर्धेपूर्वी तंदुरुस्त होणार; मीराबाई चानूला विश्‍वास

नवी दिल्ली: आशियाई क्रीडास्पर्धेला अवघ्या एका महिन्याचा कालावधी असतानाच भारताची अव्वल महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू दुखापतीने त्रस्त असल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली हाती. मात्र, आपण दोन आठवडयांमध्ये पूर्णपणे तंदुरुस्त होण्याचा विश्‍वास राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या मीराबाईने स्वत: व्यक्‍त केला आहे. मीराबाई व्यतिरिक्‍त भारताच्या राखी हल्दर (63 किलो), सतिश शिवलिंगम व अजय सिंग (77 किलो) आणि विकास ठाकूर (94 किलो) या भारोत्तोलकांवर सर्वांचे लक्ष असणार आहे.

पाठीच्या दुखण्यामुळे आशियाई क्रीडास्पर्धेमधील समावेशावर प्रश्नचिन्ह लागल्यानंतरही साईखोम मीराबाई चानू हिने या स्पर्धेसाठी दोन आठवड्यांत सज्ज होण्याचा निर्धार व्यक्त केला. पाठीचे दुखणे तितके गंभीर नसून तयारीसाठी केवळ दोन आठवड्यांची तयारी पुरेशी असल्याचे मीराबाईचे मत आहे. ती 48 किलो वजन गटात आव्हान सादर करते. सध्या ती पतियाळा येथील राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण केंद्रात कंबरेच्या वरच्या भागाचा व्यायाम करीत आहे. पुढील दोन आठवड्यांत मणिपूरच्या 23 वर्षांच्या मीराबाईच्या खेळण्याविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल.

आशियाई क्रीडास्पर्धेत भाग घेण्यासाठी मी उत्सुक असून त्याआधी नक्कीच तंदुरुस्त होऊन जोमाने सरावाला लागेन. वेटलिफ्टिंगमध्ये भारताला थायलंड, चीन, कझाकस्तान यांसारख्या देशांचे आव्हान पेलायचे आहे. त्यामुळे, मी माझे सर्वस्व पणाला लावून खेळण्यासाठी आतुर आहे, असे सांगून मीराबाई पुढे म्हणाली की, मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयात मला पाठीचा त्रास जाणवू लागला. त्यावर उपाय करण्यासाठी मी दिल्लीपासून मुंबईपर्यंत फिरले. मात्र, कोणत्याही डॉक्‍टरांना मला नेमकी कोणती दुखापत झाली आहे, हे सांगणे कठीण जात होते. माझ्या सर्व चाचण्यांचे व क्ष-किरण तपासणीचे अहवाल मी अगदी ठणठणीत आहे, हेच सिद्ध करत होते.

इंडोनेशियात 18 ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या आशियाई क्रीडास्पर्धेला एक महिन्यापेक्षा कमी वेळ असून, मीराबाईला मात्र दोन आठवड्यांत सज्ज होण्याचा विश्वास वाटतो. व्यायाम सुरू असल्याने दुखणे कमी झाल्याचे लक्षात आले आहे. दोन-तीन आठवड्यांत मी वजन उचलू शकेन, असे मीराबाई म्हणाली. नोव्हेंबर महिन्यात मीराबाईने जागतिक स्पर्धेत 22 वर्षांनंतर भारतासाठी पहिले सुवर्ण जिंकले. तिने 194 किलो वजन उचलले होते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही तिने राष्ट्रीय विक्रमासह 196 किलो वजन उचलून सुवर्ण जिंकले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button