breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

युवा अधिका-यांनी वॉर्ड स्तरावर संघटना मजबूत करावी – वरुण सरदेसाई

पिंपरी / महाईन्यूज

शिवसेना घरा-घरापर्यंत पोहोचविण्यासाठी युवा अधिकाऱ्यांनी सक्षमपणे काम करावे. वॉर्ड स्तरावर संघटना मजबूत करावी. शहरात शैक्षणिक संस्था मोठ्या संख्येने आहेत. कॉलेजमध्ये युवा संघटनेची बांधणी करावी. तरुणांना संघटनेशी जोडावे. युवा अधिकारी हा शिवसेना पक्षाचा चेहरा आहे. युवा संघटनेच्या बांधणीवरच उद्याचा शिवसेना पक्ष मजबूत होईल. युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या मदतीला धावून जावे. प्रशासनाकडे पाठपुरावा करून त्यांची कामे मार्गी लावावीत. राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवाव्यात, जनतेला त्याचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी केले.

पिंपरी-चिंचवड शहर युवासेनेच्या युवा अधिकाऱ्यांचा संवाद मेळावा सोमवारी आकुर्डीत पार पडला. पिंपरी-चिंचवड शहर युवा सेनेचे प्रमुख विश्वजित बारणे यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी वरुण  सरदेसाई बोलत होते. कोषाध्यक्ष व मुंबई महापालिकेचे नगरसेवक अमेय घोले यांनीही उपस्थित युवा सैनिकांना  मार्गदर्शन केले.

युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य प्रवीण पाटकर, रुपेश कदम, मावळ लोकसभा मतदारसंघाचे युवा सेना विस्तारक राजेश पळसकर, जिल्हा समन्वयक  अनिकेत घुले, शर्वरी गावंडे, राजेंद्र तरस, योगेश वाडकर, अभिजित गोफण, माऊली जगताप, निलेश हाके, प्रतीक्षा घुले उपस्थित होते. युवा सेनेची नवीन कार्यकारिणी संवाद मेळावा आणि पद वाटप ग्रहण सोहळा युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. युवा सेनेची जबाबदारी विश्वजित बारणे यांच्याकडे सोपविल्यानंतर झालेल्या या पहिल्याच मेळाव्याला युवा शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वरुण सरदेसाई म्हणाले, “शहरातील युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह जाणवत आहे. हा उत्सव असाच कायम ठेवण्यात यावा. युवा कार्यकर्त्यांनी प्रथम संघटनेत काम करावे. संघटना वाढवावी. वॉर्ड स्तरावर संघटना मजबूत करावी. वॉर्ड स्तरावर जाऊन काम करण्यावर भर द्यावा. केलेली कामे सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या योजना जाहीर करतात. या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम युवा संघटनेने करावे. कार्यक्रमाचे आयोजन उत्तम केल्याबद्दल त्यांनी युवा अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले”.

पिंपरी-चिंचवड शहर युवा सेनेचे प्रमुख विश्वजित बारणे म्हणाले, भविष्यात युवा संघटना आणखी मजबूत करणार आहे. संघटनेने युवा पदाधिकाऱ्यांना ताकद, बळ दिले, तर आगामी महापालिका निवडणुकीत युवा सेनेचे अनेक चेहरे सभागृहात दिसतील. शहरामध्ये संघटना मजबूत करण्यासाठी आम्ही सर्वजण एकोप्याने काम करणार आहोत, असेही बारणे म्हणाले.

अमेय घोले, विस्तार अधिकारी राजेश पळसकर यांनी युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या कार्याचा आढावा घेतला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button