TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

जोगेश्वरी टर्मिनसच्या कामाला आठ महिन्यानंतर सुरुवात 

मुंबई: मुंबई सेन्ट्रल, वांद्रे टर्मिनसवरील लांब पल्ल्याच्या गाड्यांचा भार हलका करण्यासाठी भविष्यात जोगेश्वरीत टर्मिनस बांधण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरील हे तिसरे टर्मिनस उभारणीच्या कामासाठी आणखी आठ महिन्यांपेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली. सध्या या टर्मिनसचे रेखाचित्र (डिजाईन)तयार करण्याचे काम सुरू आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वाढता भार पाहता आणखी काही टर्मिनसची भर पडणार आहे. मध्य रेल्वेवर पनवेलमध्येही टर्मिनसच्या कामाला गती दिली जात आहे. यापूर्वीच सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून, तर पश्चिम रेल्वेवर मुंबई सेन्ट्रल, वांद्रे टर्मिनस येथून मेल एक्स्प्रेस सुटतात. मात्र ही जागा अपुरी पडत असल्याने मुंबई उपनगरात आणि पश्चिम रेल्वेवरही आणखी एक टर्मिनस बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जोगेश्वरीतील टर्मिनस प्रस्तावाला २०१९ मध्ये आणि त्यानंतर पुन्हा २०२१ रेल्वे बोर्डाकडून मंजुरीही मिळाली.

मात्र करोना आणि अन्य काही तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्प पुढे सरकला नाही. आता या प्रकल्पाला गती दिली जाणार असली तरीही प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. या प्रकल्पासाठी रेखाचित्र तयार करण्याची प्रकिया सुरु असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली. हे काम पूर्ण होताच रेल्वे रूळ, फलाट इत्यादी कामे आणि प्रकल्प राबवण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. सल्लागाराच्या अहवालानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी निविदा काढली जाईल आणि त्यानंतर या टर्मिनसचे काम सुरु होण्यासाठी आणखी आठ  महिने लागणार असल्याचे ठाकूर म्हणाले. या प्रकल्पासाठी ६८ कोटी ९९ लाख येणार आहे.

जोगेश्वरी टर्मिनस येथून मेल एक्स्प्रेस गाड्या सुटतील व काही गाड्यांना येथे शेवटचा थांबा असेल. ज्यावेळी मेल एक्स्प्रेस गाड्या नसतील, त्यावेळी लोकल गाड्यांसाठीही हे फलाट उपलब्ध करण्याचा विचार आहे. त्यासाठी तीन मार्गिका, दोन फलाट बांधण्याचे नियोजन असून १२ मेल-एक्सप्रेस सोडण्याचा विचार केला जात आहे. जोगेश्वरी येथे यार्ड असून या भागात वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांची देखभाल दुरुस्ती आणि नूतनीकरणसाठी कोचिंग सेंटर तयार करण्याचे प्रस्तावीत आहे. त्यामुळे जोगेश्वरी हे भविष्यात मेल-एक्स्प्रेस गाड्यांचेही हब होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button