जनरल मोटर्स कामगारांच्या पत्नींनी रक्ताने पत्र लिहून कामगार मंत्र्यांचा केला निषेध
जनरल मोटर्स कामगारांचे रक्तदान आंदोलन; साखळी उपोषणाचा ५० वा दिवस उलटूनही शासन कुंभकर्णाच्या निद्रेत

वडगाव ः जनरल मोटर्स कामगारांनी सुरु केलेल्या बेमुदत साखळी उपोषणास 50 दिवस उलटून सरकारला जाग येईना. अखेर जनरल मोटर्स कामगारांनी रक्तदान आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या रक्तदानाद्वारे जमा झालेले रक्त सरकारला पाठविण्यात येणार आहे. तसेच कामगारांच्या पत्नींनी स्वतःच्या रक्ताने कामगार मंत्र्यांना पत्र लिहीत कामगार मंत्र्यांच्या प्रतिमेला रक्ताने अभिषेक घालून तीव्र निषेध व्यक्त केला.
गेल्या 50 दिवसांपासून जनरल मोटर्सचे कामगार त्यांच्या न्याय व हक्कासाठी साखळी उपोषण करत असून, सरकार याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या कामगार व त्यांच्या पत्नींनी तीव्र संताप व्यक्त करत अक्षरशः शासनाच्या निषेधार्थ साखळी उपोषणस्थळी कामगारांच्यावतीने रक्तदान आंदोलन करून राज्य शासन व कामगार मंत्र्यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलनाच्या 50 व्या दिवशी 101 कामगारांनी रक्तदान केले व कामगार मंत्र्यांच्या प्रतिमेस प्रातिनिधीक स्वरूपात रक्ताने अभिषेक घातला.
मराठा योद्धा मनोज जरांगेनी घेतली कामगारांची भेट
तळेगाव एमआयडीसी येथे सुरू असलेल्या जनरल मोटर्स कामगार संघटनेचे साखळी उपोषण मराठा योद्धा व मराठा क्रांती मोर्चाचे मनोज जरांगे-पाटील यांनी भेट दिली व व कामगारांची परिस्थिती जाणून घेतली.
यांची होती प्रामुख्याने उपस्थिती…
यावेळी संघटनेचे अध्यक्ष संदीप भेगडे, सचिव राजेंद्र पाटील तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी व ज्येष्ठ समाजसेवक मारुती भापकर व मराठा क्रांती मोर्चाचे मावळ तालुका समन्वयक बंटी मुर्हे उपस्थित होते.
शासन आपलं रक्त शोषण करत आहे, त्यापेक्षा आपणच बेमुदत साखळी उपोषणाच्या पन्नासाव्या दिवसापासून महाराष्ट्र शासनाचा निषेध व्यक्त करत महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर जनरल मोटर्स 1000 कामगारांचा प्रश्न सोडवण्याकरता रक्तदान आंदोलन करत आहोत”. रक्तदान आंदोलनाच्या आज पहिल्या दिवशी सरकारला कामगार प्रश्नावर जाग आणण्या करता कामगारांच्या रक्ताची पिशवी पोस्टाद्वारे पाठवण्यात येत आहे. निदान सरकारने कामगारांच्या रक्तदानाच दखल घेऊन लवकरात लवकर प्रश्न सोडवणे गरजेचे आहे.
– राजेंद्र पाटील, सेक्रेटरी, जनरल मोटर्स कामगार संघटना