ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

‘बातम्या थांबल्या की ‘भोंगा’ आपोआप थांबेल’; खासदार सुप्रिया सुळेंचा दावा

अहमदनगर| तुम्ही म्हणता तो भोंग्यांचा विषय केवळ प्रसारमाध्यमांतूनच दिसतो. मी सामान्य लोकांना भेटत आहे, तेव्हा तेथे महागाई आणि अन्य जीवनाशी निगडीत प्रश्नांवर चर्चा होताना दिसते. त्यामुळे बातम्या थांबल्या की हा विषयही आपोआप थांबेल, असा दावा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे  यांनी केला. ‘अर्थात लोकशाहीत कोणा काय बोलावे याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि प्रसारमाध्यमांनी काय बातम्या द्याव्यात, हा त्यांचा हक्क आहे. पण माझी विनंती आहे की प्रसारमाध्यमांनी प्रश्नांचे प्राधान्यक्रम ठरविले पाहिजेत,’ असे सांगण्यासही त्या विसरल्या नाहीत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आज अहमदनगरला आल्या होत्या. त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, आमदार संग्राम जगताप, आमदार निलेश लंके, आमदार डॉ. किरण लहामटे उपस्थित होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी संबंधित बहुतांश प्रश्नांना उत्तरे देणे सुळे यांनी टाळले. त्या म्हणाल्या, ‘माझे लक्ष सध्या भोंग्यांकडे नाही, तर महागाई आणि इतर प्रश्नांकडे आहे. त्यामुळे या विषयावर कोणी काय बोलले हे मी पहात नाही. या विषयाची प्रसार माध्यामांमधून जास्त चर्चा होताना दिसते. खरे तर कोणीच हा विषय वाढवू नये.’

भोंग्यांवर नव्हे, महागाईवर चर्चा हवी- सुळे

त्या पुढे म्हणाल्या, ‘सध्या देशापुढे वेगळे प्रश्न आहेत. आपण कोविडमधून सावरलो आहोत. आता महागाईचा सामना करावा लागत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे नवे संकट उभे राहिले आहे. अशा प्रश्नांकडे लक्ष देऊन वाटचाल करणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही ते काम करीत आहोत. अरुण जेटली अशा गोंधळाच्यावेळी नेहमी म्हणत की टीव्ही बंद केला की गोंधळही बंद होईल. सध्या मला जेटलींच्या त्या विचारांची आठवण होत आहे. सध्या सामान्य जनेतेला भोंग्यावर नव्हे तर महागाईच्या प्रश्नांवर चर्चा हवी आहे. मात्र काही लोकांना वातावरण कलुषित करायचे आहे. तसे झाले तर त्यासाठी प्रक्षोभक बोलणारे जबाबदार राहतील,’ असेही त्या म्हणाल्या.

राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे इतर पक्षांच्या नेत्यांनी आपली भूमिका बदलून देवदर्शन करणे आणि त्याचे फोटो शेअर करणे सुरू केले का?, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, ‘आमच्या पुरते सांगायचे झाले तर आम्ही अजिबात बदललो नाही. पूवीपासूनच आम्ही मंदिरात जातो. माझे सोशल मीडिया आकाऊंट पहा. तेथे असे फोटो दिसून येतील. त्यामुळे कोणी बोलले म्हणून बदल केला असे नाही. अयोद्धेला जाणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीयही यापूर्वी जाऊन आलेले आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका बदलली असेही म्हणता येणार नाही,’ असेही सुळे म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button