breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

…जेव्हा फडणवीसांनी मलिकांना दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याचा दिला होता इशारा; म्हणाले होते “शेवटपर्यंत मी नेणार”

मुंबई |

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी केली जात असल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँण्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांची चौकशी केली जात आहे. यानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात असून टीकेची झोड उठली आहे. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून भाजपावर टीका केली जात असताना राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जुन्या पत्रकार परिषदेची चर्चा रंगली आहे. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असून दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असा इशारा दिला होता.

  • नेमकं काय म्हणाले होते फडणवीस?

१ नोव्हेंबर २०२१ ला घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना जोरदार हल्ला चढवला होता. तसेच नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला होता. लवकरच याबाबतचे पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. “नवाब मलिक यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांना आता हे शेवटापर्यंत न्यावे लागेल,” असा सूचक इशारा फडणवीस यांनी मलिकांना दिला. यावर नवाब मलिक यांनी ट्वीट करत “है तैयार हम” असं उत्तर दिलं होतं.

  • “मलिकांनी दिवाळीपूर्वी लवंगी फटाका फोडलाय, मी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार”

देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, “दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आव नवाब मलिक आणत आहेत. जो फोटो त्यांनी ट्विट केला आहे तो चार वर्षांपूर्वीचा आहे. रिव्हर मार्चच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला विनंती केल्यानंतर आम्ही त्या मोहिमेशी जोडले गेलो होतो. मी त्यांना मदत करत होतो. त्या गाण्याच्या शूटिंगच्या वेळी हे फोटो काढण्यात आले आहेत. नवाब मलिकांनी जाणीवपूर्वक माझ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला याच्या पाठीमागची मानसिकता दिसत आहे. रिव्हर मार्चने स्पष्ट केले आहे की तो भाड्यानं आणलेला माणूस आहे. त्यामुळे त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही.”

  • “मलिकांनी सुरुवात केली, त्यामुळे त्यांना आता हे शेवटापर्यंत न्यावे लागेल”

“भाजापाचे ड्रग्ज कनेक्शन आहे असे मलिक म्हणाले तर त्यांचे जावई ड्रग्जसोबत सापडले आहेत. नवाब मलिकांच्या म्हणण्यानुसार अख्खी एनसीबी ही ड्रग्ज माफिया व्हायला पाहिजे. कारण संबंध नसलेल्या व्यक्तीसोबत फोटो आल्याने जर कोणी माफिया होत असेल तर ज्यांच्या घरी ड्रग्ज सापडतात त्यांचा पक्ष काय होणार आहे? नवाब मलिकांनी लवंगी फटाका लावलाय आता त्यांनी लक्षात ठेवावे दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडणार आहे. कारण मी काचेच्या घरात राहत नाही. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डसोबत आहेत अशा लोकांनी माझ्यासोबत बोलू नये. यासंदर्भातील पुरावे तुमच्या समोर मांडेन. तसेच शरद पवार यांच्याकडे नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असलेले पुरावे पाठवणार आहे. आता त्यांनी सुरुवात केली आहे त्यामुळे त्याला आता शेवटापर्यंत न्यावे लागेल,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

  • फडणवीसांचा दूत बनून नीरज गुंडे उद्धव ठाकरेंना मांडवलीसाठी भेटायचा : नवाब मलिक

नवाब मलिकांनी फडणवीसांवर आरोप करताना म्हटलं होतं की, “फडणवीस सरकारच्या काळात नीरज गुंडे देवेंद्र फडणवीस यांचा दूत म्हणून उद्धव ठाकरेंना मांडवलीसाठी भेटायचा. सरकार सुरू असताना फडणवीस आणि ठाकरेंचे नाते बिघडत होते. त्यावेळी नीरज गुंडे फडणवीसांचे निरोप घेऊन उद्धव ठाकरेंकडे मांडवली करण्यासाठी जायचा. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत असतानाही गुंडे भाजपा आणि शिवसेना सोबत यावी यासाठी प्रयत्न करत होता. गुंडेचा उद्धव ठाकरेंशी काहीही संबंध नाही.”

  • “महाराष्ट्रात नीरज गुंडेच्या माध्यमातून फडणवीसांकडून वसुली”

“हे प्रकरण महाराष्ट्रातील मोठ्या ड्रग्ज व्यवसायाचं आहे. देवेंद्र फडणवीस यांचा एक वजीर याच शहरात राहतो. त्याचं नाव निरीज गुंडे असं आहे. फडणवीस सरकारच्या काळात त्याला मुख्यमंत्री निवास, मुख्यमंत्री कार्यालयात, सर्व अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रवेश होता. सर्व पोलिसांच्या बदल्या तो ठरवत होता. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील तोच ठरवायचा. महाराष्ट्रात त्याच्याच माध्यमातून वसुली केली जायची,” असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.

  • “केंद्रीय तपास संस्थांच्या कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांचा वाझे फिरताना दिसतोय”

नवाब मलिक यांनी फडणवीस सरकारच्या काळातील बदल्यांवरही गंभीर आरोप केले होते. ते म्हणाले होते की, “देवेंद्र फडणवीस नवी मुंबई किंवा पुण्याला जायचे तेव्हा सायंकाळी त्यांच्या घरी हजेरी लागायची. फडणवीस सातत्याने नीरज गुंडेच्या घरी बसायचे. तिथूनच देवेंद्र फडणवीसांचं मायाजाल चालायचं. सरकार बदलल्यानंतर महाराष्ट्रात ईडी, सीबीआय, आयकर किंवा एनसीबी अशा सर्व केंद्रीय तपास संस्थांच्या कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांचा वाझे फिरताना दिसत आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये कोट्यावधी रुपये वसूल केले जात आहेत.”

  • “महाराष्ट्रातील सर्व ड्रग्जचा खेळ देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर चालतो”

“समीन वानखेडे मागील १४ वर्षांपासून मुंबईत वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करत आहेत. त्यांच्या बदल्या करण्यात महाराषट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांना प्रसिद्धी मिळवत लोकांना फसवण्यासाठीच एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आलं. ड्रग्जचा खेळ मुंबई आणि गोव्यात सुरू राहावा म्हणून समीर वानखेडे यांना आणण्यात आलं. काशिफ खान सारखे मोठमोठ्या ड्रग पेडलरला सोडून देण्यात येतं. ऋषभ सचदेवा, आमीर फर्नीचरवाला, प्रतिक गाबा यांना सोडून देण्यात येतं. महाराष्ट्रातील सर्व ड्रग्जचा खेळ देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर चालतो,” असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button