TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

नवी मुंबईतील पोलीसांच चाललंय तरी काय…पोलीस दलाच्या मोटार परिवहन वाहन विभागातील लाखोंचा गैरव्यवहार उघड

नवी मुंबई | नवी मुंबई पोलीस दलातील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरण सध्या बाहेर येत आहेत. सप्टेंबर महिन्यात पोलीस उपनिरिक्षकांकडून बदल्यांसाठी त्याच ठाण्याचे पोलीस निरिक्षकच लाख रुपयांची लाच घेत असताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. हे प्रकरण संपत नाही तोच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील मोटार वाहन विभागातील बनावट पावत्यांमार्फत सूमारे पावणेसात लाख रुपयांचे गैरव्यवहाराचे प्रकरण सध्या पोलीस आयुक्तालयात चर्चेत आहे.

मोटार चालक शिपायाने पेट्रोलपंपावरील काही कर्मचा-यांच्या मदतीने हा गैरव्यवहार केला असून गेल्या सहा महिन्यापासून हा भ्रष्टाचार सूरु होता. पोलीसांच्या वाहनांमध्ये खारघर येथील पेट्रोलपंपातून इंधन भरण्यासाठी दोनशे बनावट पावत्या संबंधित कर्मचा-याने छापल्याचे पोलीसांच्या चौकशीत उघड झाले. गेल्या सहा महिन्यांपासून लेखा विभागाच्या डोळ्यात धूळफेक करुन हा प्रकार सूरु होता. मात्र पोलीस दलातील वाहनांच्या इंधनावरील खर्चाच्या नोंदवहीत नोंदी भरत असताना खारघर येथील आशिष सर्व्हीस पेट्रोलपंपाच्या बनावट पावत्या मिळाल्याने हा गैरव्यवहार उघडकीस आला. पोलीस आयुक्तालयाच्या उपायुक्तांनी या प्रकरणी चौकशी आदेश दिल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिड महिना चौकशी केल्यानंतर नवी मुंबई मोटार वाहन विभागातील चालक पोलीस शिपाई, खारघर येथील पेट्रोलपंपाच्या मालकासह अजून सहा जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा कळंबोली पोलीस ठाण्यात नोंदविला आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद वाघमारे यांनी या प्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. पोलीस उपनिरिक्षक रमेश गांगुर्डे यांना सर्वात आधी या प्रकरणाचा सूगावा लागला. पोलीस उपनिरिक्षक गांगुर्डे हे नोंदवहीत इंधनाच्या देयकांची व पावतींची नोंद टाकत असताना त्यांना आशिष सर्व्हीस पेट्रोलपंपांकडून आलेल्या इंधनाच्या पावत्यांचा संशय आला. पावत्यांवरील क्रमांक तपासून पाहील्यावर फेब्रुवारी ते सप्टेंबर महिन्यातील इंधनाच्या पावत्या एकाच प्रकारच्या व सिरीयल प्रमाणे असल्याचे आणि त्यावर मोटार वाहन चालक पोलीस शिपाई संतोष म्हात्रे याच्या स्वाक्षरी असल्याचे समोर आले. हे प्रकरण पोलीस उपायुक्तांसमोर ठेवल्यावर त्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त वाघमारे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणाशी पोलीस शिपाई संतोष म्हात्रे यानेच हा सर्व गैरव्यवहाराचा कट रचला आणि त्यासाठी पेट्रोलपंपाच्या मालकांसह इतर कर्मचा-यांशी संगनमत केल्याचे चौकशी करणा-या अधिका-यांना समजले. सहाय्यक पोलीस आयुक्त वाघमारे यांनी दिलेल्या फीर्यादीत पोलीस म्हात्रे यांच्यासह आशिष हौसिला तिवारी, गोविंद चौहान, विनायक म्हात्रे, भरत सकपाळ, आशिष पेट्रोलपंपाचे मालक काशिनाथ बहिरम, पंपाचे व्यवस्थापक राजेंद्र चंदाणी, पंपाचे पर्यवेक्षक राजेश प्रजापती यांच्यावर संगनमत करुन बनावट इंधन देयकाव्दारे 6 लाख 83 हजार रुपयांची राज्य सरकारची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button