ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डिजिटल क्राइम विषयी सावधगिरी बाळगणे गरजेचे: डॉ. हॅराल्ड डिकोस्टा

पिंपरी चिंचवड | भारतासारख्या विकसनशील देशामध्ये इंटरनेट वापरकर्त्यांचे प्रमाण लक्षणीय असून विशेषतः सोशल मीडियाच्या वापरामध्ये सध्याची युवा पिढी आघाडीवर आहे. तसेच वैयक्तिक आणि सार्वजनिक माहितींवरील सायबर हल्ल्यामध्ये झालेली वाढ लक्षात घेता, प्रत्येकाने आपली वैयक्तिक व सार्वजनिक माहिती सुरक्षित ठेवण्याबाबत योग्य काळजी घेत, डिजिटल क्राईम पासून सावध राहावे, असे आवाहन प्रख्यात सायबर तज्ञ व सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष डॉ. हॅराल्ड डिकोस्टा यांनी केले.माजी केंद्रीय कृषिमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आधारस्तंभ पद्मविभूषण मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे आयोजित शारदा व्याख्यानमालेमध्ये ‘सायबर गुन्हे – जागृती’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. याप्रसंगी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्रजी घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

या व्याख्यानाचे प्रास्ताविक करत असताना पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदीप कदम यांनी सर्वप्रथम विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध उपक्रमांविषयी माहिती देत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा शिक्षण मंडळ घेत असलेल्या नेत्रदीपक भरारी वर भाष्य केले. तसेच मानवी जीवनामध्ये क्रांती घडवणाऱ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा बदलत्या काळानुसार दुरुपयोग होत आहे अशी खंत व्यक्त करत भारत तसेच जगामध्ये होणाऱ्या सायबर गुन्ह्यांची पार्श्वभूमी स्पष्ट केली. त्याचबरोबर उच्चशिक्षित लोकांचा सायबर गुन्ह्यांमधील सहभाग लक्षात घेता याविषयी अंतर्मुख होत चिंतन करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले

‘सायबर गुन्हे – जागृती’ या विषयावर दुसऱ्या पुष्पामध्ये मार्गदर्शन करत असताना सायबर तज्ञ व सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष डॉ. हॅराल्ड डिकोस्टा यांनी सायबर गुन्ह्याची संकल्पना व प्रकार सविस्तर स्पष्ट केले. त्याचबरोबर आपण वापरत असलेल्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती अपलोड करताना कोणती काळजी घ्यावी, सायबर टेररिजम, ऑनलाईन प्रलोभने व फसवणुकीचे प्रकार, इंटरनेट व्हायरस म्हणजे काय व त्याचे प्रकार, इंटरनेटमुळे कौटुंबिक कलहात झालेली वाढ, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, क्रिप्टो करन्सी व्यवहार इत्यादी घटकावर माहितीपूर्ण सादरीकरण करत विविध देशांमधील सुरक्षा संस्थांसोबत काम करताना आलेल्या अनुभवांवर माहिती दिली.

व्याख्यानानंतर प्रश्नोत्तर सत्रामध्ये मानद सचिव ॲड. संदीप कदम यांनी अँटी व्हारयसची उपयुक्तता, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख यांनी सायबर लॅा व ॲानलाईन क्राईम,आणि प्राचार्य डॅा. नितीन घोरपडे यांनी क्लाउड डाटा व हेल्थी प्रॅक्टिसेस इन ॲानलाईन शॅापिंग या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले. तसेच बिटकॉईन, सोशल मीडिया अकाउंटची सुरक्षितता, डेबिट कार्ड व गोपनीयता या विषयावर उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर व्याख्यात्यांनी अभ्यासपूर्ण उत्तरे दिली.

या दुसऱ्या पुष्पाचे सूत्रसंचालन डॉ. माया माईनकर तर आभार प्रदर्शन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख यांनी केले.
झुम अॅपवर आयोजित या व्याख्यानामध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांमधून सुमारे ६३० पेक्षा जास्त विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. सदर व्याख्यानाच्या यशस्वितेसाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व शाखाप्रमुख यांनी परिश्रम घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button