TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रभाग रचनेच्या हरकतींवर शुक्रवारी अॅटो क्लस्टर येथे सुनावणी

साडेपाच हजार हरकतींवर दिवसभर सुनावणी

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेच्या आराखड्यावर आलेल्या हरकती व सुचनांवर शुक्रवारी (दि.25) सुनावणी होणार आहे. चिंचवड येथील अॅटो क्लस्टरमध्ये राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे हे 5 हजार 684 हरकतींवर सकाळी 10 वाजल्यापासून सुनावणी घेणार आहेत. दरम्यान, किती हरकती ग्राह्य धरणार की सर्वच फेटाळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आगामी निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार 2011 ची लोकसंख्या विचारात घेऊन प्रारुप प्रभाग रचना केली आहे. महापालिकेची प्रभाग रचना 1 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाली. 139 नगरसेवक संख्येसाठी तीन सदस्यांचे 45 तर चार सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे. प्रभाग रचनेवर 14 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागविल्या होत्या. सर्वाधिक हरकती भोसरी विधानसभा मतदार संघातील आहेत.

प्रभाग 1, 5, 6, 7, 8, 10, 14, 20, 42 व 43 या प्रभागांबाबत हरकती आहेत. 14 फेब्रुवारीपर्यंतच्या कालावधीत सुमारे 5 हजार 684 हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या. या प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांवर 25 फेब्रुवारी रोजी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे सकाळी 10 वाजता सुनावणी सुरु होणार आहे. या सुनावणीचे वेळापत्रक महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
व्याप्तीबाबतच्या सर्वाधिक हरकती असून नागरिक, विद्यमान नगरसेवकांनीही हरकती घेतल्या आहेत. आलेल्या हरकतींचे हद्द, वर्णन, नाव, आरक्षण व इतर अशा पाच पद्धतीने वर्गीकरण करण्यात आले. एकाच प्रकारच्या व विशिष्ट प्रभागाशी संबंधित हरकती एकत्र करून त्याची यादी आयोगाला सादर केली होती.

या हरकती सूचनांच्या सुनावणीसाठी राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांची राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. कवडे 25 फेब्रुवारी रोजी हरकतींवर सुनावणी घेणार आहेत. 2 मार्च 2022 रोजी प्राधिकृत अधिका-यांच्या सुस्पष्ट अभिप्रायांसह महापालिका आयुक्त यांच्यामार्फत हा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर 5 मार्च पर्यंत अंतिम आराखडा प्रसिद्ध होईल.

हरकतदारांना पाठवली सुनावणीची नोटीस

हरकतदारांना या सुनावणीची नोटीसदेखील पाठवण्यात आली आहे. मात्र ज्या हरकतदारांना नोटीस प्राप्त झाली नसेल त्यांनी महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील निवडणूक कार्यालयातून ती प्राप्त करून घ्यावी, असे महापालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे. सुनावणीला येताना हरकतदारांनी आपल्यासोबत हरकत अर्ज दाखल केल्याची पोहोच, सुनावणी नोटीसीची प्रत, स्वतःचे कोणतेही एक ओळखपत्र घेऊन यावे तसेच कोविड 19 च्या अनुषंगाने दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र, मास्क, सॅनिटायझर सोबत बाळगावे, आदी सूचना देण्यात आल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button