breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#waragainstcorona: पुण्यातील पेशंटना पिंपरी-चिंचवडमध्ये आणण्यास ‘या’ कारणास्तव विरोध : आमदार महेश लांडगे

– प्रशासनाने पिंपरी-चिंचवड मनपा प्रशासनाचा विचार करावा!

– आगामी काळात रुग्णसंख्या वाढल्यास आम्ही काय करावे?

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

पुणे महानगरपालिका हद्दीत कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तेथील आरोग्य व्यवस्थेवर ताण येत असल्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल करण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी प्रशासनाच्या या भूमिकेला विरोध केला आहे. अडचणीच्या काळात माणुसकीच्या नात्याने मदत करणे अपेक्षीत असताना पुण्यातील रुग्णांना विरोध का? यामागील कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘महाईन्यूज’ने केला. याबाबत आमदार लांडगे यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने सविस्तर बाचचित केली.

आमदार लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराची सध्या लोकसंख्या सुमारे २५ लाखांच्या घरात आहे. पुणे महापालिका प्रशासनाकडे पिंपरी-चिंचवडच्या तुलनेत ‘मॅनपॉवर’जास्त आहे. इन्फ्रास्ट्रक्चरही तुलनेत अधिक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुण्यामध्ये सध्यस्थितीला जास्त दिसत आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेता आगामी काळात आम्ही ‘थर्ड स्टेज’ला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग,आज जी परिस्थिती पुण्यात आहे. तशीच पिंपरी-चिंचवडमध्ये होईल. अशा परिस्थितीत पुण्यात पिंपरी-चिंचवडमध्ये अतिरिक्त रुग्ण उपचारासाठी दाखल केल्यास पिंपरी-चिंचवडच्या आरोग्य व्यवस्थेवर ताण येणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील वाढलेले रुग्ण आपण भविष्यात कुठे दाखल करणार आहोत?

पुण्यात काम करणाऱ्या कोविड योद्धांची व्यवस्था पुण्यातच करावी…

नवी मुंबई, ठाणे, डोंबवली, कल्याण, बदलापूर आदी भागांत कोरोना बाधितांची संख्या वाढण्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे या भागातील कोविड योद्धे हे मुंबई सिटीमध्ये कर्तव्य बजावत आहेत. आरोग्य सेवेत सुमारे २ हजार कर्मचारी मुंबई सिटीमध्ये जातात. परिणामी, संपर्कातून होणारा कोविड उपनगरांतही पसरला आहे, असे दिसते. त्यामुळे पुणे परिसरात काम करणाऱ्या कोविड योद्धयांची सर्व व्यवस्था पुणे महापालिकेने त्यांच्या हद्दीमध्येच करावी. तसेच, पिंपरी-चिंचवडमध्ये पुण्यातून येवून काम करणाऱ्या कोविड योद्धयांची सर्व व्यवस्था पिंपरी-चिंचवड महापालिकेने केली पाहिजे. त्यामुळे काहीप्रमाणात आपण कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालू शकतो, असे आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

रुपीनगर  परिसर पिंपरी-चिंचवडमधील ‘हॉटस्पॉट’

पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवडमध्येही कोरोनाच्या सामूहिक संसर्गाचा धोका वाढला आहे. रुपीनगर आणि ओटास्किम परिसरात सध्यस्थितीला आतापर्यंत ३४ रुग्ण आढळले आहेत. दाट लोकवस्ती असलेल्या किंवा झोपडपट्टी परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. आगामी एक-दोन महिन्यांत सुमारे २५ लाख लोकसंख्या गृहित धरून कोरोना प्रादुर्भाव रोखण्याची यंत्रणा पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभा केली आहे. पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडकडे मनुष्यबळ कमी आहे. मग, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यास येथील रुग्ण आपण कुठे हलवणार आहोत? असा सवाल आमदार लांडगे यांनी उपस्थित केला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णालये दोन अन् भार इतका….

पिंपरी-चिंचवडमध्ये यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि भोसरीतील मनपा रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, सर्वसाधारण आजारपणावर उपचार घेण्यासाठी खेड, जुन्नर, आंबेगाव, चाकण, देहूरोड, आळंदी आदी भागांतून नागरिक येत आहेत. त्यात पुन्हा कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितील आपत्ती व्यवस्थापनासाठी त्या-त्या महापालिका प्रशासनाने आपल्या हद्दीतील वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेवून यंत्रणा उभा करण्याची अपेक्षा आहे. त्याप्रमाणे पुणे महापालिकने यंत्रणा उभा करण्याबाबत पिंपरी-चिंचवडला अवश्य मदत मागावी, पण उपचारासाठी रुग्ण पिंपरी-चिंचवडमध्ये पाठवणे योग्य होणार नाही. पिंपरी-चिंचवड महापालिका व्यवस्थापनावरील कोविड-योद्धे पुण्यातील रुग्णांना सेवा देताना ‘घायाळ’ झाले, तरआमच्या शहरातील कोरोनाविरोधात लढताना काय करावे? असा आमचा प्रश्न आहे, असेही लांडगे यांनी म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये ५०० रुग्णांचीच क्षमता…?

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने कोरोना रुग्णांबाबत सुमारे ५०० रुग्णांची यंत्रणा उभा केली आहे. सध्यस्थितीला शहरात ११० च्या घरात रुग्ण आहेत. आगामी दोन-तीन दिवसांत शहरातील रुग्णांचा आकडा २०० च्या वर जावू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या निरीक्षणानुसार भारतातील सामूहिक संसर्ग कमी होण्यासाठी जुलै महिनाअखेर उजाडेल, असे सांगण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवडमधील कोरोनबाधित रुग्ण वाढल्यास त्याची काळजी कुठे घ्याची हा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे पुण्यातील रुग्णांना पिंपरी-चिंचवडमध्ये उपचारासाठी दाखल करण्याबाबत माझा विरोध हा तांत्रिक अडचणींना गृहीत धरुन आहे. पुण्याची क्षमता कधिही पिंपरी-चिंचवडपेक्षा जास्त आहे. कोरोना नियंत्रणासाठी सध्या चार सनदी अधिकाऱ्यांची टीम नेमली आहे. त्यामुळे पुणे महापालिका आणि स्थानिक आस्थापनांनी तेथील रुग्णांचा भार पिंपरी-चिंचवड महापालिकेवर देवू नये, अशी माझी प्रामाणिक मागणी आहे, असेही आमदार महेश लांडगे ‘महाईन्यूज’शी बोलताना म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button